परभणी : जिंतूर बसस्थानक परिसरातील तो खून पैशाच्या लुटमारीतूनच; तिघांना जेरबंद | पुढारी

परभणी : जिंतूर बसस्थानक परिसरातील तो खून पैशाच्या लुटमारीतूनच; तिघांना जेरबंद

परभणी; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर (जि.परभणी) बसस्थानक परिसरात सातारा जिल्ह्यातून झालेल्या व्यक्तीकडून पैशाची लुटमार करण्यासाठी त्याचा खून झाला असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या आत जिंतूरमधील तिघा जणांना ताब्यात घेतले. आरोपींनी  पैशासाठीच खून केल्याची कबुली दिली आहे.

माहितीनुसार, जिंतूर बसस्थानकाजवळ असलेल्या नाल्यातील झाडाझुडपांमध्ये गुरूवारी (दि.२१) सकाळी ३५ ते ४० वर्षीय वयाच्या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्या व्यक्तीचा चेहरा छिन्न-विछीन्न झालेला व डोके रक्ताने माखलेले होते. त्याच्या गळ्यास रूमालाने गाठ मारून आवळलेले असल्याचे निदर्शनास आल्याने हा खुनच असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिस अधिक्षक रागसुधा आर यांनी त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा व जिंतूर पोलिसांना दिले.

मृत व्यक्ती साताऱ्या जिल्ह्यातील

तपासात ती व्यक्ती सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील वागजाईवाडी येथील महेंद्र यशवंत सावंत असल्याची माहिती मिळाली. मृत महेंद्र सावंतचे फोटो त्याचा भाऊ मच्छिंद्र सावंत यास पाठवून खात्री करण्यात आली. महेंद्र सावंत हा मे महिन्यामध्ये विटा (जि.सातारा) येथे कामासाठी जातो असे म्हणून घरातून निघून गेलेला होता. तेव्हापासून त्याचा संपर्क झालेला नव्हता. अशी माहिती त्याच्या भावाकडून मिळाली. या माहितीच्या आधारे तांत्रिक विश्‍लेषण व गोपनीय महितीनूसार महेंद्र सावंत हा बुधवारी (दि.20) रोजी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास जिंतूरातील बसस्थानकासमोरील झुडूपाच्या दिशेने गेला असल्याची व त्यानंतर तीन व्यक्ती त्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली.

या तीन संशयितांचा शोध घेतल्यानंतर ते शेख मुसेफ शेख मोसीन (रा.नामदेव नगर), भारत आसाराम पहारे (रा.नामदेव नगर) व राजेश पांडूरंग शिंदे (रा.संभाजीनगर) असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या तिघांनाही ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, जिंतूरचे निरीक्षक अनिरूद्ध काकडे, फौजदार गोपीनाथ वाघमारे, अंमलदार विलास सातपुते, सिद्धेश्‍वर चाटे, विष्णू चव्हण, राम पौळ, नामदेव डुबे, मधुकर ढवळे, संजय घुगे आदींनी ही कामगिरी बजावली.

तिघेही मारेकरी जिंतूरातीलच

पैशाची लुटमार करण्यासाठी महेंद्र सावंत याला बसस्थानक परिसरात फिरून त्याचा पाठलाग केला. तो नाल्याजवळील झाडाझुडपाकडे गेल्याच्या बाबीवर हेरगिरी करत जिंतूरातील तिघा युवकांनीच त्याच्याजवळील पैसे लुटण्यासाठी त्याला जीवे मारले. अत्यंत निर्घृण पद्धतीने त्याच्या चेहर्‍यावर वार करीत छिन्नविछीन्न करून गळा आवळत या युवकांनी त्याला संपविले. जिंतूर शहरातीलच हे तिन्ही तरूण 21 ते 30 वर्ष वयोगटातील आहेत.

हेही वाचा

Back to top button