Pune Crime : शर्ट बदलून चोरी करणार्‍या सराइताला ठोकल्या बेड्या | पुढारी

Pune Crime : शर्ट बदलून चोरी करणार्‍या सराइताला ठोकल्या बेड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात विविध ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकींची चोरी केल्यानंतर विविध रंगांचे शर्ट बदलून तपास भरकटविण्याचा प्रयत्न करणार्‍या सराइताला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरीविरोधी पथक 2 ने बेड्या ठोकल्या. मुज्जफर उर्फ सलमान रफीक ( रा. घुलेनगर, मांजरी खुर्द, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीला गेल्यानंतर दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकातील अंमलदार शिवाजी जाधव, संदीप येळे आणि राहुल इंगळे हे चोरीच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करत असताना मुज्जफर पठाण याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीला गेलेले वाहन जप्त करण्यात आले.

त्याच्याकडे चौकशी करण्यात आल्यानंतर कशा पध्दतीने चोरी करतो याबाबत चौकशी केली असता चोरी करण्यासाठी येताना आठ ते दहा वेगवेगळ्या रंगांचे शर्ट एकावर एक घालून बनावट चावीने दुचाकी चोरी करत असल्याचे त्याने सांगितले. तसेच चोरी झाल्यानंतर शर्ट काढून फेकून देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून 8 दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या असून, 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर व नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

पेट परीक्षा डिसेंबरमध्ये; अर्ज करण्याची प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये

Konkan Ganeshotsav : मळगावातील ८० कुटुंबांचा एक गणपती !

शेवगाव तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायतींचे मतदार अंतिम !

Back to top button