पेट परीक्षा डिसेंबरमध्ये; अर्ज करण्याची प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये | पुढारी

पेट परीक्षा डिसेंबरमध्ये; अर्ज करण्याची प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आणि संलग्न संशोधन केंद्रामध्ये पीएच.डी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीची पीएच.डी. प्रवेश परीक्षा (पेट) डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. पेट परीक्षा घेण्याबाबतची कार्यवाही विद्यापीठाच्या प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानुसार प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात असल्याने, या जिल्ह्यांमधील विद्यार्थी हे पेट परीक्षेची आतुरतेने वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यातील विद्यार्थीही परीक्षा देतात. यंदाची पेट परीक्षाही कधी होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने पेट परीक्षा घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यानुसार मार्गदर्शकांकडून त्यांच्याकडे असलेल्या रिक्त जागाची माहिती पाठविण्याची सूचना केली आहे. त्यासाठी 20 सप्टेंबरपर्यत मुदत देण्यात आली आहे.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, साधारण नोव्हेंबर महिन्यात परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर डिसेंबर महिन्यात परीक्षा होणार आहे. मार्गदर्शकांनी त्यांच्याकडे असलेल्या रिक्त जागांची माहिती वेळेत पाठविल्यास, परीक्षा लवकर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदा प्रवेशासाठी विविध विद्याशाखांमध्ये साधारण दोन हजार जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या जागांमध्ये वाढही होऊ शकते, असे देखील विद्यापीठातील अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

मार्गदर्शकांनी वेळेत जागांची माहिती द्यावी

पेट प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी मार्गदर्शक असलेल्या प्राध्यापकांनी त्यांच्याकडे असलेल्या रिक्त जागांची माहिती वेळेत अपलोड करण्याची आवश्यकता आहे. मात्र, अनेक प्राध्यापक हे रिक्त जागा पाठविण्याबाबत टाळाटाळ करतात. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया रखडते. त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रियेत आवश्यक जागा अपडेट होत नाहीत. अशावेळी कमी विद्यार्थ्यांना पीएचडी अभ्यासक्रमाला संधी मिळते. त्यामुळे मार्गदर्शकांनी वेळेत जागांची माहिती देण्याचे आवाहन देखील विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा

होय! या झाडाला पैसे लागतात!

मराठवाड्यात २१ ते २३ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

पिंपरी : जलवाहिनीवरील स्थगिती उठूनही पालिका प्रशासन ठप्पच

Back to top button