कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात बाप्पाची प्रतिष्ठापना | पुढारी

कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात बाप्पाची प्रतिष्ठापना

कुरुंदवाड; जमीर पठाण : गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणेशभक्तांनी येथील गणेश मंदिर, विविध संस्था, घराघरात व सार्वजनिक मंडळात निरनिराळ्या वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी, गुलाल व फुलांच्या पाकळ्यांची उधळण करीत भक्तांनी बाप्पांना घरी आणत विधीवत प्रतिष्ठापना करत आहेत. आपल्या लाडक्या गणरायाला घेण्यासाठी पुरुषांच्या बरोबरच महिलांची संख्याही लक्षणीय आहे.

कुरुंदवाड पटवर्धन संस्थान कालीन शहरात आज पारंपारिक वाद्याच्या गजरात गेल्या दोन शतकापासूनची परंपरा अखंडित सुरू ठेवत राजवाड्यातील संस्थानकालीन दीड दिवसाच्या गणपतीची पालखीने नेऊन अत्यंत भक्ती भावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. कुरुंदवाडचे पटवर्धन राजे श्रीमंत भालचंद्रराव चिंतामणराव पटवर्धन सरकार, राणी सरकार, श्रीमंत राजकुमार रघुराजे भालचंद्रराव पटवर्धन, श्रीमंत राजकुमारी राजश्रीदेवी पटवर्धन यांनी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली.

गणपती नेण्यासाठी कुंभार गल्ली, मारुती चौक, मध्यवर्ती बाजारपेठ शहर व परिसरात भक्तांनी फुलून गेला होता. येथील कुडेखान मशीद, कारखाना मशीद, बैरागदार मशीद, शेळके मशीद, ढेपणपूर मशिद या पाच मशिद व गणेश मंदिरात भक्तिमय वातावरणात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, सायंकाळी कुडेखान मशीद, ढेपणपूर मशीद, बैरागदार मशीद, शेळके मशीद आणि कारखाना मशीद येथे प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

हे ही वाचा :

Back to top button