कोल्हापूर : सत्ता कुणाचीही असो, गोंधळ ठरलेलाच! | पुढारी

कोल्हापूर : सत्ता कुणाचीही असो, गोंधळ ठरलेलाच!

कोल्हापूर, विकास कांबळे : गेल्या सुमारे दीड दशकापासून गोकुळमध्ये सत्ता कोणाचीही असो गोंधळ ठरलेलाच आहे. आरोपदेखील जवळपास तेच आहेत. परंतु, आरोप करणारे बदलले आहेत. पूर्वी आरोप करणारे आज सत्तेत बसले आहेत, तर पूर्वी सत्तेत असणारे आज विरोधकांची भूमिका बजावत आहेत. सत्तांतरापूर्वी गोकुळच्या सभेत महादेवराव महाडिक असायचे, सत्तांतरानंतर आता आ. सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला जात आहे. या सर्व प्रकरणामध्ये सभासदांचे हित मात्र फारसे कोठे दिसत नाही. गोकुळची मात्र बदनामी होत आहे.

जिल्ह्याच्या अर्थकारणात आणि अलीकडील राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजाविणार्‍या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) वाढती आर्थिक उलाढाल पाहून सर्वांनाच तो आपल्या ताब्यात हवा आहे. माजी आ. महादेवराव महाडिक यांच्याकडे अनेक वर्षे सत्ता होती तेव्हा महाडिक व सतेज पाटील एकत्र होते. परंतु, गोकुळमध्ये आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून पाटील आग्रह धरू लागल्यामुळे त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. त्यातून पेटलेला वणवा अजूनही शांत झालेला नाही.

महाडिक यांच्यापासून पाटील बाजूला झाल्यानंतर त्यांनी आपले लक्ष गोकुळवर केंद्रित केले. आ. पाटील गोकुळच्या प्रत्येक सभेत महाडिक यांना टार्गेट करत होते. यातून सभेत गोंधळ व्हायचा. त्यामुळे सभा गुंडाळली जायची. गोकुळच्या कारभारावर अंकुश रहावा म्हणून 2009 मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाकाराने गोकुळ बचाव कृती समिती स्थापन झाली. पुढे ही समिती सर्वपक्षीय झाली आणि त्यामध्ये आ. सतेज पाटील आघाडीवर राहिले.

महाडिक यांची सत्ता असताना गोकुळच्या सभेत वासाच्या दुधाचे काय झाले? अमूक गावातील दूध विक्रीचा किंवा पॅकिंगचा ठेका कोणाला दिला? टँकर कोणाचे किती आहेत, असे प्रश्न उपस्थित करून सभेमध्ये गोंधळ निर्माण केला जायचा. तीन वर्षापुर्वी गोकुळमध्ये सत्तांतर झाले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील यांनी एकत्र येत महाडिक यांची सत्ता संपुष्टात आणली. सत्तेवर आल्यानंतर पहिली सभा कोरोनामुळे ऑनलाईन घ्यावी लागली. दुसर्‍या सभेत वासाचे दूध, टँकरचा ठेका कोणाला दिला? पॅकिंग, विक्रीच्या ठेक्याचे काय झाले? असेच प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात येऊ लागले. पुर्वी महाडिक आपल्या नातेवाईकांना ठेका देत होते आता सत्तेवर आलेली मंडळी आपल्या नातेवाईकांना ठेका देतात. असे आरोप होत आहेत. त्यामुळे या प्रश्नावरून गोकुळच्या सभेतील गोंधळाची परंपरा या सभेतही कायम राहिली.

गेल्या दीड दशकात सभा गोकुळची असली तरी टार्गेट मात्र महादेवराव महाडिक असायचे. सत्ता बदलानंतर मात्र परिस्थिती बदलली. विरोधक सत्तेवर गेले आहेत. आ. पाटील व मंत्री मुश्रीफ सध्या गोकुळमध्ये नेते आहेत. त्यामुळे सत्तांतरानंतर सभा जरी गोकुळची असली तरी निशाणा मात्र आ. सतेज पाटील यांच्यावर साधला जातो. आ. हसन मुश्रीफ यांच्या नावाचा विरोधक उल्लेखही करत नाही. या सर्वाचा परिणाम गोकुळ ब्रॅंडवर होणार आहे. खासगी कंपनीला टक्कर देत दुग्ध व्यवसायात राज्यात गुणवतेच्या जोरावर आघाडीवर असणारा गोकुळ जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. तो ब्रॅंड टिकवायचा, वाढवायचा की नाही याचा विचार आता करण्याची गरज आहे.

अध्यक्षांचा अनुभव आला कामी

सभेच्या बाहेर आणि सभेतही गोंधळ आणि हुर्रेबाजी सुरू होती, तरीदेखील अनुभवाच्या जोरावर गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी त्याकडे दुर्लक्ष करत सभेचे कामकाज व्यवस्थित पार पाडले. तासभर चाललेल्या या सभेत डोंगळे यांनी अहवाल सालात राबविलेल्या योजना तसेच भविष्यात राबविण्यात येणार्‍या योजनांचा आढावा घेतला शिवाय सभासदांनी विचारलेल्या सर्व लेखी प्रश्नांना उत्तरेही दिली.

Back to top button