गोवा : एक तरुण वाचवणार चार जीव; गोमेकॉच्या पुढाकाराने अवयव दान | पुढारी

गोवा : एक तरुण वाचवणार चार जीव; गोमेकॉच्या पुढाकाराने अवयव दान

पणजी,  पुढारी वृत्तसेवा : बेळगाव येथील दुचाकीद्वारे अपघातग्रस्त झालेल्या एका २५ वर्षीय तरुणाचा ब्रेन डेथ झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयाने संमती दिल्यानंतर सदर युवकाचे चार अवयव प्रत्यारोपण करून ४ व्यक्तीचे प्राण वाचवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) चे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी आज शुक्रवारी बांबोळी येथे ही माहिती दिली.

अपघातात जबर जखमी झालेल्या या युवकाला दि.१३ सप्टेंबर रोजी गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. मात्र, लगेच त्यांचा ब्रेन डेथ झाल्याने डॉ. सनत भाटकर व डॉ रुक्मा कोलवाळकर व आपण त्या युवकाच्या कुटुंबांशी संपर्क साधून त्याचे अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी दान करण्याची विनंती केली. त्यानी ती मान्य केल्यानंतर राज्य अवयव प्रत्यारोपण संस्था (रोटो) आणि राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण संस्था (नोटो) यांनी संयुक्तपणे सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या. काल रात्रभर त्या युवकाचे अवयव वेगळे करून ते साठवून ठेवण्यात आले. त्याचे एक मूत्रपिंडाचे (किडणी) गोमेकॉत दाखल असलेल्या एका ३१ व़र्षीय युवकाला प्रत्यारोपण केेले जाईल. तर दुसरे मूत्रपिंड हेल्थ वे इस्पितळातील ४६ वर्षीय व्यक्तीला प्रत्यारोपण केले जाईल. त्यामुळे दोन गोवेकराचे प्राण वाचणार आहेत.

गोव्यात ह्रदय (हार्ट) व लिव्हर (यकृत) चे प्रत्यारोपण करण्याची सुविधा नाही. त्यामुळे सदर युवकांचे ह्रदय चेन्नई येथील एका गरजवंताला व यकृत दिल्ली येथील सैनिक इस्पितळातील एका सैनिकाला प्रत्यारोपण केले जाणार आहे. त्यासाठी आज ग्रीन केरीडोर स्थापून पोलिसांच्या सहकार्याने ह्रदय व यकृत खास १०८ रुग्णवाहिकेतून विमानतळाकडे नेण्यात आले तेथून विमानातून ते दिल्ली व चेन्नई येथे नेण्यात येणार असल्याचे डॉ. बांदेकर यांनी सांगितले. आपल्या २५ वर्षीय मुलाचे चार अवयव दान केल्याबद्दल आपण त्या युवकांच्या कुटुंबाचे आभार व्यक्त करत असून त्यांचा मुलगा चार व्यक्तीच्या रूपात जिवंत राहणार आहे, असे डॉ. बांदेकर म्हणाले.

या पूर्वी वाराणसी येथील युवकांचे गोव्यात ब्रेन डेथ झाल्यानंतर त्याच्या कुटुबियांने त्याचे सहा अवयव दान केले. ज्यामुळे सहा जनांचे प्राण वाचले होते. गोव्यातील दोन व्यक्तींना त्याचे मूत्रपिंड प्रत्यारोपण केले होते. तर डोळे, ह्रदय , यकृत, आतडे हे अवयव गोव्याबाहेरील गरजवंताना प्रत्यारोपण केले होते, अशी माहिती डॉ. बांदेकर यांनी दिली.

गोमेकॉकडून सहावेळा अवयव प्रत्यारोपणाचे कार्य

गोव्यात रोटोची स्थापना २०१९ मध्ये केल्यानंतर गंभीर आजारी व्यक्तींना हवे ते अवयव अशा प्रकारे ह्रेन डेथ झालेल्या किवा अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाने दान करावेत यासाठी प्रयत्न केले जातात. आत्तापर्यंत सहा वेळा असा प्रकारे अवयव प्रत्यारोपणाचे कार्य गोमेकॉने केल्याचे डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

गोमेकॉमध्ये ४१ जणांना किडणी हवी आहे. सध्या ४१ व्यक्ती किडणीसाठी वेटिंगवर आहेत. या सर्वावर सध्या डायलिसिस उपचार सुरू आहेत. त्या सर्वांना किडणीची गरज आहे. त्यामुळे अपघात झाल्यानंतर एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडल्यानंतर किवा उपचारादरम्यान ब्रेन डेथ झाल्यानंतर सदर व्यक्तीच्या कुटुबियांनी संमती दिल्यास त्या व्यक्तीचे अवयव प्रत्यारोपण करण्याची संधी असते. मात्र बहुतांश कुटुंबीय त्यासाठी तयार नसतात, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button