YashoBhoomi Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी यशोभूमीचे राष्ट्रार्पण | पुढारी

YashoBhoomi Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी यशोभूमीचे राष्ट्रार्पण

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : YashoBhoomi Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस रविवारी (17 सप्टेंबर) आहे. या दिवशी पंतप्रधान मोदी दिल्लीतल्या द्वारका भागात उभारलेल्या ‘यशोभूमी’ हे जागतिक दर्जाचे एक्स्पो केंद्र देशाला अर्पण करतील. यशोभूमीच्या या संपूर्ण प्रकल्पासाठी 5400 कोटी रुपये खर्च झाला आहे. देशात बैठका, परिषदा आणि प्रदर्शने आयोजित करण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्याच्या धोरणांतर्गत इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर (IICC) चा पहिला टप्पा कार्यान्वित झाला आहे.

यशोभूमी एक्स्पो केंद्राचे एकूण क्षेत्रफळ 8.9 लाख चौरस मीटर आहे. या भव्यतेमुळे यशोभूमीला एमआयसीई (बैठक, प्रोत्साहन, परिषद आणि प्रदर्शने) सुविधा देणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या केंद्रांमध्ये स्थान मिळेल, असा ठाम दावा सरकारने केला आहे. या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुख्य सभागृह, भव्य बॉलरूम आणि 13 बैठक दालने, तर 15 अधिवेशन खोल्या आहेत. एकाचवेळी त्यामध्ये 11 हजार प्रतिनिधी सामावून घेण्याची त्यांची क्षमता आहे. ऑडिटोरियममध्ये अत्याधुनिक स्वयंचलित तसेच प्रेक्षकगृहाच्या शैलीतील आसन व्यवस्था आहे. या कन्व्हेन्शन सेटंरमध्ये मुख्य सभागृह भव्य असून त्यात तब्बल 6000 आसन क्षमता आहे. या प्रेक्षक गृहातील लाकडी फ्लोअरिंग आणि आकर्षक भित्तीपटल पाहुण्यांना जागतिक दर्जाच्या अनुभवाची हमी देणारे असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. (YashoBhoomi Inauguration)

यशोभूमीमध्ये आकर्षक ग्रॅन्ड बॉलरुम देखील असून त्यात एकाचवेळी 2500 पाहुणांचे आदरातिथ्य केले जाऊ शकते. तर याच ठिकाणी 500 लोक बसू शकतील असा खुला भाग देखील आहे. या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये असलेल्या आठ मजल्यांवरील खोल्यांमध्ये वेगवेगळ्या बैठका घेण्याचीही व्यवस्था आहे. तर, जगातील सर्वात मोठ्या प्रदर्शन गृहांपैकी एक प्रदर्शनगृह यशोभूमीमध्ये उभारण्यात आले आहे. या प्रदर्शन गृहाचा उपयोग प्रदर्शने, व्यापार मेळावा, व्यावसायिक कार्यक्रमांसाठी केला जाईल. (YashoBhoomi Inauguration)

याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली विमानतळ मेट्रो एक्सप्रेस लाइनच्या विस्ताराचे उद्घाटन करतील. द्वारका सेक्टर 21 ते द्वारका सेक्टर 25 मधील नवीन मेट्रो स्टेशनच्या उद्घाटनासोबत यशोभूमी देखील दिल्ली विमानतळ मेट्रो एक्सप्रेस लाईनशी जोडली जाणार आहे.

Back to top button