चार महिन्यांत सोने 2,900 रुपयांनी स्वस्त | पुढारी

चार महिन्यांत सोने 2,900 रुपयांनी स्वस्त

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सणासुदीच्या हंगामात सोने किंवा दागिने खरेदी करण्याचा विचार करणार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोन्याच्या मागणीत मोठी वाढ असून, दरात घसरण झाल्याने गणेश चतुर्थीला सोने खरेदी करणार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या चार महिन्यांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याने 61,650 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठली होती. जो आता 59,000 रुपयांच्या खाली घसरला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, 13 सप्टेंबर 2023 रोजी सोने 58,724 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरले आहे. म्हणजेच गेल्या चार महिन्यांत सोन्याचा भाव 2,926 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरला आहे. या चार महिन्यांत सोन्याचे भाव 4.75 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या चार महिन्यांत केवळ सोनेच नाही, तर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चांदी 77,000 रुपयांच्या वर प्रतिकिलो 77,280 रुपये होती, जी 70,925 रुपये प्रतिकिलोवर आली आहे. म्हणजेच गेल्या चार महिन्यांत चांदीच्या किमतीत 8.22 टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, सणासुदीच्या काळात चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

दिवाळीत 62 हजार रुपयांची पातळी गाठणार?

गणेश चतुर्थीनंतर ऑक्टोबरमध्ये नवरात्र, दसरा आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये धनत्रयोदशी आणि दिवाळी असते. दिवाळी आणि धनत्रयोदशीला सोन्याच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत मागणी वाढल्याने येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत यू टर्न येऊ शकतो. सराफ बाजारातील तज्ज्ञांच्या मते, दिवाळी आणि धनत्रयोदशीपर्यंत सोने 62,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते. सध्या सोन्या-चांदीच्या दरात नरमाई असली, तरी सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यानंतर मागणी वाढल्याने दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

Back to top button