मुंबई : महापालिकेत अभियंत्यांची भरती रखडली! | पुढारी

मुंबई : महापालिकेत अभियंत्यांची भरती रखडली!

प्रकाश साबळे

मुंबई :  गेल्या तीन महिन्यांपासून राज्य सरकारच्या लालफितीमध्ये महापालिकेत अभियंत्यांच्या भरती प्रक्रियेची बिंदू नामावली अडकली आहे. यामुळे पालिकेत येवू घातलेल्या ६६४ भावी अभियंत्यांची भरती रखडलेली आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेकडे आस लावून बसलेले भावी इंजिनियर्स चिंतेत आहेत. राज्य सरकारने लवकरात लवकर बिंदू नामावली जाहीर करून ती पालिका प्रशासकाकडे सादर करण्याची मागणी होत आहे.

महाराष्ट्र शासनाने केलेल्या सूचनेनुसार बिंदू नामावली तयार केली जाते. सरकारच्या बिंदू नामावलीप्रमाणे विविध विभागातील पदभरती होते. दरवर्षी बिंदू नामावली सुधारित केली जाते. समाजातील विविध प्रवार्गांना आरक्षण लागू असल्याकारणाने सर्वांना समान न्याय देणे व समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी बिंदू नामावली दरवर्षी सुधारितरित्या प्रसिध्द होते. मात्र ती ‘तीन महिन्यांपासून राज्य सरकाकडे धूळखात पडलेली आहे.

पालिकेतील अभियंता संवर्गातील अनेक पदे रिक्त आहेत. यासाठी ६६४ अभियंत्यांची पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता पदी ३६९ आणि दुय्यम अभियंतापदी ३१५ पदांचा समावेश आहे. ही सर्व पदे भरण्यास महापालिका प्रशासनाची मान्यता मिळालेली आहे. यासाठी राज्य सरकारच्या बिंदू नामावलीची आवश्यकता असते. तीन महिन्यांपूर्वी प्रशासकाने राज्य सरकारकडे बिंदू नामावलीचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु सरकारकडून तो महापालिका प्रशासनाकडे अद्यापही आला नसल्याने भावी अभियंत्यांची गेल्या तीन महिन्यांपासून भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे भरतीची जाहिरात प्रकाशित होवू शकली नाही, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी सूत्रांनी दिली.

Back to top button