‘लोकशाहीवरील हल्ला परतवून लावण्याच्या लढाईत काँग्रेसला साथ द्या!’ | पुढारी

'लोकशाहीवरील हल्ला परतवून लावण्याच्या लढाईत काँग्रेसला साथ द्या!'

सरूड : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाने दिलेल्या विकासात्मक धोरणांच्या मजबूत पायावर विविधतेने नटलेल्या स्वतंत्र भारत देशाची एकता आजही टिकून आहे. सध्या देशामध्ये सत्ताधारी भाजपचे द्वेषाचे राजकारण सुरू आहे. यामुळे कोणताही एक घटक सुरक्षित आणि समाधानी नाही. राज्यघटनेचा मूळ पायाच उध्वस्त करण्याचे जाणीवपूर्वक कटकारस्थान सुरू असल्याने लोकशाहीवरील हल्ला परतवून लावण्याच्या लढाईत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला भक्कम साथ द्या, असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी केले.

काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जनसंवाद पदयात्रेचे मंगळवारी (दि. १२) रोजी सकाळी शाहूवाडी तालुक्यात आगमन झाले. शिवसेना (ठाकरे गट) तसेच राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जनसंवाद यात्रेचे स्वागत केले. यावेळी बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक महादेव पाटील यांनी केले.

यावेळी आ. सतेज पाटील म्हणाले की, काँग्रेस पक्षाने देशातील अतिसामान्य माणसाला सन्मान देण्यासाठी सत्तेचा वापर केला. याच विचाराने पक्षाचे वरीष्ठ नेते राहुल गांधी आजही अथकपणे कार्यरत आहेत. याउलट पोकळ आश्वासने, लबाडी आणि जातीयवादाचे राजकारण करणाऱ्या सत्ताधारी भाजपवर आता जनतेचा विश्वास राहिलेला दिसत नाही. महागाईने त्रस्त सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरत आहे. गॅस सिलेंडरचा दर कमी झाल्यावर पंतप्रधानांना नऊ वर्षानंतर बहिणींच्या ओवाळणीची आठवण झाली. आताही निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोलचे दर कमी करून कदाचित ते भावांची आठवणही काढतील, अशी उपरोधिक टीकाही केली.

काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने प्रत्येक तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी अहोरात्र झटत राहणार आहे. शाहूवाडीत कर्णसिंह गायकवाड यांच्या पाठीशी माझ्यासह काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

यावेळी गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड, संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, योगीराज गायकवाड, माजी सभापती महादेवराव पाटील, सभापती पंडितराव नलवडे, बाजीराव जाफळेकर, डॉ. प्रभाकर कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश डोंगरे यांनी तर प्रकाश पाटील यांनी आभार मानले.

नरेंद्र मोदींना ‘इंडिया’ ची मोठी धास्ती

दरम्यान सभेनंतर प्रसारमाध्यमांशी झालेल्या संवादामध्ये सतेज पाटील म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा तळागाळातील गोरगरीब लोकांशी नाळ जुळलेला आणि रुजलेला पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाला परिवर्तन नवीन नाही. म्हणूनच राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ ची नरेंद्र मोदींनी धास्ती घेतली होती. आतातर देशातील विरोधी पक्षांच्या एकीतून आकाराला आलेल्या ‘इंडिया’ आघाडीचीही नरेंद्र मोदींसह भाजपला मोठी धास्ती वाटत आहे. जिल्ह्या-जिल्ह्यातील परिसंवाद यात्रेला जनतेचा मिळणारा प्रतिसाद भाजपला सतावत नसेल तर नवलच आहे.

हेही वाचा : 

Back to top button