किणी; पुढारी वृत्तसेवा : पेठवडगाव-टोप वडगाव रस्त्यावर वडगांव न्यायालयाजवळ आयशर टेम्पो व मोटरसायकलच्या झालेल्या भीषण अपघातात बाजीराव भूपाल चव्हाण (वय ४५ रा. शिवाजीनगर सावर्डे ता. हातकणंगले) हे जागीच ठार झाले.
आज (दि. ११) दुपारच्या सुमारास झालेल्या या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, शिरोली येथील औद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीत काम करत असलेले सावर्डे येथील बाजीराव चव्हाण आपल्या मोटारसायकलवरून (क्र.एम एच-०९-सीएच-६२३८) कामावरून घरी परत निघालेले होते. यावेळी वडगाव न्यायालयाजवळ पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने (एमएच-१०-के-८०६९) चव्हाण यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार चव्हाण टेम्पोच्या चाकाखाली सापडले. पुढच्या चाकात सापडल्याने चव्हाण यांना टेम्पोने सुमारे पंचवीस ते तीस फूट फरफटत नेले. यादरम्यान त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पडला होता. वडगाव पोलिसांत याबाबत फिर्याद देण्याचे काम सुरू आहे.