नाशिक : दोन महिने उलटूनही पुरेसा पाऊस पडत नसल्याने पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. दुष्कळात टँकरने पाणी आणून पिके वाचवण्याची धडपड शेतकरी वर्ग करत होता. मात्र, पाणी टंचाईमुळे पिके वाचवून दोन पैसे पदरात पडतील अशी स्वप्न बघणारा शेतकरी मात्र मोठ्या आर्थिक अडचणीत आला आहे.
एका महिन्यापूर्वी टोमॅटोच्या किमती या गगनाला भिडल्या होत्या. अनेक ग्राहकांनी तर टोमॅटो खरेदी करणे बंद केले होते. पण आता टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. शेतक-यांचा उत्पादन खर्चही आता सुटत नाही आहे.
ऊन, पाऊस, दुष्काळ या तिहेरी संकटातुन वाचवलेली टोमॅटो आता मागील 8 दिवसांत प्रति कॅरेट 90 ते 100 रुपये इतकाच दर टोमॅटोला मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शेतक-यांमध्ये मोठी संतापाची लाट दिसून येत आहे. केंद्र सरकार जेव्हा दर वाढवते तेव्हा तातडीने दर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असते. परंतु, दर कोसळल्यावरही लक्ष घालावे अशी मागणी टोमॅटो उत्पादक शेतकरी करत आहे.
नव्वद शंभर रुपयात टोमॅटो परवडत नाही. टोमॅटोचे दर वाढवणे गरजेचे आहे अन्यथा शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडेल. दर पडल्यावर केंद्र सरकार का बोलत नाही?
गणेश शेटे, टोमॅटो उत्पादक शेतकरी
आता केंद्र सरकारने नाफेड मार्फत 50 रुपये किलोने शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावा. अन्यथा स्वाभिमानी राज्यभर रस्त्यावर उतरणार.
संदीप जगताप, स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष
हेही वाचा :