मालेगावात पुन्हा गोळीबार झाल्याने खळबळ; जुन्या भांडणाची कुरापत काढून झाडल्या गोळ्या… | पुढारी

मालेगावात पुन्हा गोळीबार झाल्याने खळबळ; जुन्या भांडणाची कुरापत काढून झाडल्या गोळ्या...

मालेगाव मध्य : शहरात गेल्या काही दिवसात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. तसेच भरदिवसा हल्ले होण्याचे प्रकार होत असताना आता शहरातील बदरका बाडा येथील हॉटेलजवळ मागील भांडणाची कुरापत काढून एका तरूणावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे मालेगाव पुन्हा गोळीबाराने हादरले असून खळबळ उडाली आहे.

सोमवारी (दि.४ ) पहाटे गोळीबाराची घटना घडली. उनैस मलीक शेख मोबीन याने आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. उनैस हा त्याच्या मित्रासोबत चहा पिण्यासाठी बदरकाबाडा येथील यादगार पान स्टॉल येथे गेला होता. त्यावेळी हॉटेलसमोर रस्त्यावर उभा असलेल्या वहाबअली जाकीरअली ( वय २३, रा. पवारगल्ली) व त्याचा मित्र इब्राहीम बल्लू यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून ‘तुम बुलेट का बडा आवाज करके यहा पर क्यु आते हो’ असे म्हणत उनैस यास शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच वहाब याने त्याचा मित्र इब्राहीम बल्लूकडून पिस्टल घेवून उनैस व त्याच्या मित्रावर पिस्टलने गोळीबार केला. सुदैवाने यात दोन्ही बचावले.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी संशयित आरोपी बहाबअली यास अटक करण्यात आली आहे. इब्राहीम बल्लू हा फरार झाला असून त्याचा शोध आझादनगर पोलिस घेत आहेत.

हेही वाचा :

Back to top button