ओ‌बीसी, मराठा समाज 17 टक्क्यांत बसणार नाही : छगन भुजबळ | पुढारी

ओ‌बीसी, मराठा समाज 17 टक्क्यांत बसणार नाही : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. १७ टक्क्यांमध्ये ५४ टक्के ओबीसी आणि मराठा समाज बसणार नाही, त्यामुळे कोणाच्याच वाट्याला काही येणार नाही. मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या सगळ्यांसह विरोधी पक्षानेदेखील आपले मत मांडले पाहिजे. ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा न येता, मराठा समाजाला कसा न्याय देता येईल, हे बघितले पाहिजे, असा सल्ला मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, मराठा समाजाला ओबीसीत घ्यायला काही हरकत नाही, मात्र यासाठी एक तर एकूण आरक्षणाची मर्यादा वाढवा किंवा ओबीसींचा टक्का वाढवून मराठा समाजाला ओबीसीत घ्या. आमची काही हरकत नाही. मात्र, टक्का न वाढवता मराठ्यांना ओबीसीत घेऊ नये. नाही तर दोन्ही समाजांचा काहीच फायदा होणार नाही. यावर आज भुजबळ यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया देत, मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र 17 टक्क्यांत 54 टक्के ओबीसी आणि मराठा समाज बसणार नाही, असे म्हटले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले या सगळ्यांसह विरोधी पक्षानेदेखील आपले मत मांडले पाहिजे. ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा न येता, धक्का न लावता मराठा समाजाला कसा न्याय देता येईल हे बघितले पाहिजे. सगळ्यांनी जाऊन दिल्लीत बसले पाहिजे. हे सगळे करता येणे सहज शक्य आहे. नाहीतर या सगळ्या लढाया सुरूच राहणार आहेत, मोर्चे निघणार आंदोलन होणार, परत तोंडाला पाने पुसली जाणार, असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button