महिलेचा अपमान करणे म्‍हणजे विनयभंग नव्‍हे : दिल्‍ली उच्‍च न्‍यायालय | पुढारी

महिलेचा अपमान करणे म्‍हणजे विनयभंग नव्‍हे : दिल्‍ली उच्‍च न्‍यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लिंग -विशिष्‍ट कायदे एखाद्या विशिष्ट लिंगाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने आहेत. अपशब्‍द वापरणे म्‍हणजे महिलेच्‍या शिष्‍टाचाराचा अपमान होत नाही. एखाद्या महिलेला अपशब्‍द उच्‍चारुन तिच्‍याशी उद्धटपणे वागणे म्‍हणजे विनयभंग करणे नव्‍हे, असे निरीक्षण दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाने ( Delhi High Court) नुकतेच नोंदवले. तसेच महिलेला अपशब्‍द उच्‍चारल्‍याप्रकरणी संशयित आरोपीविरोधातीला दाखल खटला रद्द करण्‍याचे आदेशही न्‍यायालयाने दिले.

काय घडलं होतं?

तक्रारदार महिला आणि या प्रकरणातील संशयित आरोपी एका संस्‍थेत काम करत होते. पुरुष हा वरिष्‍ठ अधिकारी होता.
त्‍याने महिलेकडे एक हजार रुपयांची मागणी केली. याला महिलेने नकार दिला. यावेळी त्‍याने तक्रारदार महिलेला ‘घाणेरडी महिला’ असे संबोधले, असा त्‍याच्‍यावर आरोप होता. याप्रकरणी महिलेने दिलेल्‍या फिर्यादीनुसार, संशयितावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ५०९ नुसार (शब्द, हावभाव किंवा स्त्रीच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतूने कृती) विनयभंगाचा गुन्‍हा दाखल झाला होता. यासंदर्भातील खटला रद्द करण्‍यासाठी संशयित आरोपीने उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली होती.

Delhi High Court : …तर खटल्याचा निकाल वेगळा लागला असता

याचिकेवर न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले की, “या प्रकरणात घाणेरडी महिला हा शब्द एकाकीपणे, संदर्भाशिवाय उच्‍चारला गेला आहे. त्‍यामुळे हे प्रकरण एखाद्या महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याचा हेतू असणार्‍या आयपीसीच्‍या कलम ५०९ मध्‍ये बसणार नाहीत. स्त्रीच्या विनयशीलतेला ठेच पोहोचवण्याचा गुन्हेगारी हेतू दर्शवणारे किंवा इतर कोणत्याही शब्दांचा उल्लेख किंवा इतर कोणतेही हावभाव याचा उल्लेख असता, तर खटल्याचा निकाल वेगळा लागला असता.”
घाणेरडी महिला या शब्दाचा कथित वापर एखाद्या महिलेच्या विनयभंगाच्या निकषावर बसेल असा निष्कर्ष काढण्यासाठी त्याच्याकडे आवश्यक हेतू नसल्याचे स्पष्ट होते. त्‍यामुळे स्त्रीच्या विनयभंगाच्या व्याख्येत या प्रकरणाचा समाविष्ट होणार नाही, असेही न्यायमूर्ती शर्मा यांनी सांगितले.

हेही वाचा : 

 

Back to top button