पुढारी ऑनलाईन डेस्क : Allhabad High Court : आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या पान मसाला आणि गुटख्याचा प्रचार करणाऱ्या अमिताभ, शाहरुख, अजय देवगणसह अनेक कलाकारांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 22 सप्टेंबर 2022 रोजी दिलेल्या आदेशाचे पालन करून, केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच कोणतीही योग्य कारवाई न केल्याबद्दल दाखल केलेल्या अवमान याचिकेवर उत्तर मागवले आहे. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने केंद्रीय कॅबिनेट सचिव आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्तांना नोटीस बजावली.
न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठाने मोतीलाल यादव यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर हा आदेश दिला असून कॅबिनेट सचिव राजीव गौबा आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा का देऊ नये, अशी विचारणा केली आहे. खंडपीठाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 9 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली.
उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मोतीलाल यादव यांनी म्हटलंय की, पद्म पुरस्कार सन्मानित अभिनेत्यांनी आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या पान मसाला आणि गुटख्याच्या जाहिरातींचा भाग होऊ नये. हे कोणत्याही परिस्थितीत न्याय्य आणि नैतिक नाही. याचिकेत अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अजय देवगण, अक्षय कुमार, सैफ अली खान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे कलाकार गुटखा कंपन्यांच्या उत्पादनांची जाहिरात करताना दिसतात.
याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की त्यांनी 15 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांचे निवेदन सादर केले होते, परंतु आजपर्यंत त्यांच्या निवेदनावर निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा चित्रपट कलाकारांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.