Neymar in India : नेमारच्या जादूचा खेळ रंगणार पुण्याच्या मैदानात! | पुढारी

Neymar in India : नेमारच्या जादूचा खेळ रंगणार पुण्याच्या मैदानात!

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वातून भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची आहे. ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार यावर्षी भारतात खेळण्यासाठी येणार आहे. फुटबॉलमधील आशियाई चॅम्पियन्स लीगमध्ये नेमारचा नवीन संघ अल हिलाल आणि भारताच्या मुंबई सिटी एफसी या क्लबमध्ये लढत होणार आहे. एएससी चॅम्पियन्स लीगच्या गट फेरीचा ड्रॉ गुरुवारी (दि.२४) जाहीर झाला. यामध्ये अल हिलाल, मुंबई सिटी एफसी, इराणचा एफसी नासाजी मजंदरन आणि उझबेकिस्तानचा नवबाहोर या चार क्लबचा ड गटात समावेश करण्यात आला आहे. (Neymar in India)

युरोपमधील पॅरिस सेंट जर्मन क्लबसोबतचा करार संपुष्टात आल्यानंतर नेमार सौदी अरबमधील अल हिलाल या दिग्गज क्लबशी जोडला गेला. सौदी क्लबमध्ये ब्राझीलियन खेळाडूशी दोन वर्षांसाठी करार केला आहे. या मोठ्या डिलनंतर नेमारला सुमारे २७१३ कोटी रुपये मिळणार आहेत. (Neymar in India)

मुंबई सिटी एफसीचे होम ग्राऊंड बदलले

दरम्यान, अल हिलाल आणि भारताच्या मुंबई सिटी एफसी यांच्यातील बहुप्रतिक्षीत सामना मुंबईच्या होम ग्राऊंडवर खेळण्यात येणार होता. परंतु या सामन्यासाठी लागणाऱ्या सोई सुविधांची पुर्तता करण्यास मैदान व्यवस्थापन असमर्थ ठरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आयोजकांनी स्पर्धेचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा सामना पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे खेळवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नेमारचा जादूई खेळ पाहण्यासाठी आता पुणे गाठावे लागणार आहे.

सिटी फुटबॉलकडे मुंबई सिटी एफसी संघाची मालकी

अबुधाबीच्या सिटी फुटबॉल ग्रुपकडे युरोपीय दिग्गज क्लब मँचेस्टर सिटी क्लब आणि मुंबई सिटी एफसीची मालकी आहे. मुंबई सिटी एफसीने गेल्या मोसमात आशियाई चॅम्पियन्स लीगमध्ये चमकदार कामगिरी केली होती.

रोनाल्डोच्या भारतीय चाहत्यांचा हिरमोड

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आशियाई स्पर्धेतील सामना खेळण्यासाठी भारतात येईल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. परंतु रोनाल्डोचा संघ अल नासर गट ई मध्ये आहे. आणि मुंबई सिटी एफसी गट ड गटात आहे. यामुळे या दोन संघांमध्ये सामना होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रोनाल्डो भारतीय मैदानावर खेळताना पाहण्याचे चाहत्यांचे स्वप्न भंगले आहे.

हेही वाचा;

Back to top button