पीक नुकसान भरपाई : ‘अग्रीम’साठी राजकीय पक्षांनी ठोकला शड्डूू! | पुढारी

पीक नुकसान भरपाई : ‘अग्रीम’साठी राजकीय पक्षांनी ठोकला शड्डूू!

धाराशिव; भीमाशंकर वाघमारे

पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील शेती पावसाअभावी पुन्हा संकटात सापडली आहे. पीके कोमेजू लागली आहेत. खरीप हंगामात निराशा पदरी पडत आहे. त्यामुळे आता पीक विमा कंपनीने कायद्यानुसार अग्रीम म्हणजे पीक नुकसानीपोटी भरपाईच्या 25 टक्के आगावू रक्‍कम देण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. त्यामुळे पीक विमा कंपनी पुन्हा ‘लक्ष्य’ होणार आहे. शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी सरकार काय पावले उचलते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिली आहे. आगमनही महिनाभर उशिरानेच सुरु झाले होते. केवळ आठ ते दहा दिवस भुरभुरत्या पावसाच्या भरवश्यावर जुलै महिन्यात पेरण्या झाल्या होत्या. त्यालाही उशिर झाल्याने बहुतांश शेतकर्‍यांनी सोयाबीनला पसंती दिली आहे. दरम्यान, आता पावसाने 25 ते 30 दिवसांची ओढ दिली असल्याने ही पिके कोमेजू लागली आहेत. अनेक भागात तर वाळून चालली आहेत. माळरानावरील पिके मोडण्याशिवाय शेतकर्‍यांसमोर पयार्य राहिलेला नाही.

जिल्ह्यात पाच लाख 49 हजार हेक्टरवर खरिप पिकांची पेरणी झालेली आहे. यात सोयाबीनखालील क्षेत्र चार लाख 73 हजार 841 हेक्टर इतके विक्रमी क्षेत्र आहे. तर पावसाची सरासरी पाहता ती केवळ ४६ टक्के आहे. ही पेरणीही जुलैच्या पावसावर असल्याने उशिरा झालेली आहे. सोयाबीन फुलोरा अवस्थेत असून पावसाच्या खंडामुळे फुलगळ होऊन नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करताना मंडळ निवडण्याच्या निकषांत २१ दिवस व त्यापेक्षा जास्त पावसाचा खंड, सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी पाऊस असे निकष आहेत. ऑगस्ट महिन्यात सर्वच मंडळामध्ये पाऊस पडलेला नाही, परंतु केंद्राच्या विमा कंपनी धार्जिण मार्गदर्शक सुचनेनुसार एका दिवसामध्ये अडीच मिमी पाऊस पडल्यास पावसाचा दिवस गृहीत धरला जातो. पावसाचा खंड मध्येच संपतो. २२ ऑगस्टपर्यंत फक्त २१ दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड असलेली ५७ पैकी ३१ मंडळे आहेत. सर्व मंडळामध्ये ऑगस्टमध्ये २२ तारखेपर्यंत कुठेही पाऊस झालेला नाही.

त्यामुळेच आता शेतकर्‍यांना अग्रीम देण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील यांनी तर याबाबतचे सविस्तर तांत्रिक बाबींचा उल्‍लेख करुन तसे निवेदनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. भाजपचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही लवकरात लवकर हा अग्रीम शेतकर्‍यांना मिळेल यादृष्टीने प्रयत्न होत असल्याचे कळविले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनीही यासाठी सरकारकडे आग्रही मागणी केली आहे. यावरुनच दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना आता पीकविमा कंपनी मदतीचा हात कधी व कसा देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button