पुणेकरांमध्ये मुंबईच्या बाप्पांची ’क्रेझ’ | पुढारी

पुणेकरांमध्ये मुंबईच्या बाप्पांची ’क्रेझ’

कसबा पेठ : पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला असून, बाजारात ठिकठिकाणी बाप्पांच्या मूर्तींचे स्टॉल सजू लागले आहेत. यंदा मुंबईच्या धर्तीवर तयार केलेल्या गणेशमूर्तींच्या बुकिंगला भाविकांकडून प्रतिसाद मिळत आहे. तसेच, रत्नजडीत दागिन्यांच्या मूर्तींनाही भाविकांची पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दरम्यान, या वर्षी कच्चा माल महागल्याने बाप्पांच्या मूर्तींच्या किमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात सध्या विविध रूपांतील गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. नागपंचमीच्या मुहूर्तावर भाविकांनी मूर्तीचे बुकिंग करण्यास सुरुवात केल्याचे कसबा पेठेतील जनार्दन पवळे संघ मार्केटमधील विक्रेत्यांनी सांगितले.

दर वर्षी बाजारात विविध प्रकारच्या गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे भाविकांचा कल असतो. यंदा पारंपरिक गणेशमूर्तींच्या बुकिंगकडे भाविकांचा कल दिसून येत आहे. मुंबईच्या धर्तीवर तयार केलेल्या मूर्तींचे बुकिंग करण्यास भाविक प्राधान्य देत आहेत. तसेच आसनमांडी, चौरंग, उंदीर चौरंग, म्हैसुरी गणपती यांसह पुण्यातील मानाचे पाच गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, शारदा गणेश आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या पारंपरिक मूर्तींचे बुकिंग करण्याकडेही भाविकांचा कल आहे. मूर्तीचे डोळे, रंग, पितांबर आणि मुगुटासह विविध बाबींकडे भाविक बारकाई लक्ष देत असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.

किमतीत 20 ते 25 टक्क्यांची वाढ
यंदा कच्च्या मालाचे दर वाढल्याने बाप्पांच्या मूर्तींच्या किमतीत 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. बाजारात सध्या 700 रुपयांपासून ते 21 हजार रुपयांपर्यंत किमतीच्या मूर्ती विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत. नागपंचमीच्या दिवशी चांगले बुकिंग झाले आहे. या वर्षी गणेशमूर्तींच्या विक्रीतून मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

 

मूर्ती बुक केल्यानंतर भाविकांच्या आवडीनुसार पुणेरी पगडी, धोतर, शाल, तसेच मनपसंतीच्या रंगात बदल देण्याचे नियोजन केले जात आहे. मूर्तीच्या पितांबराचा रंग भाविकांच्या आवडीनुसार उपलब्ध करून दिला जात आहे. राजस्थान, गुजरातवरून शाडूच्या मूर्ती येत आहेत. रायगड जिल्ह्यातील पेण येथून मूर्ती बाजारात दाखल होत आहेत.
                                                        – सुशांत डेरे, मूर्ती विक्रेते, कसबा पेठ.

मुंबईतील गणेश गल्ली, लालबाग, खैरेवाडी येथील बाप्पांच्या धर्तीवर बनविलेल्या गणेश मूर्तींच्या बुकिंगला यंदा भाविकांचा प्रतिसाद मिळत आहे. तसेच रत्नजडीत दागिने, पितांबर, पारंपरिकता या बाबींकडेही भाविक मूर्तींचे बुकिंग करताना विशेष लक्ष देत आहेत.
                                            – सचिन डाखवे, मूर्ती विक्रेते, कसबा पेठ

Back to top button