तोंडाने 80 किलो वजन उचलण्याचा विश्वविक्रम | पुढारी

तोंडाने 80 किलो वजन उचलण्याचा विश्वविक्रम

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये राहणार्‍या विकास स्वामी या 38 वर्षांच्या तरुणाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद झाली आहे. त्याने तोंडाने 80 किलो वजन उचलण्याचा विश्वविक्रम केला होता. यापूर्वी त्याने 2021 मध्ये एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नाव नोंदवले होते.

अनेक विश्वविक्रमांना गवसणी घालणारा हा माणूस तेरा वर्षांपूर्वी एका मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झाला होता. मात्र, त्या संकटातून बाहेर पडून त्याने आपले नवे जीवन घडवले. करनावल नावाच्या गावाचा रहिवासी असलेल्या विकासचा 2010 मध्ये हा अपघात झाला होता. त्याच्या डोक्यात एक खिळा घुसला होता. त्यामधून बरे झाल्यावर त्याने एका शाळेत ड्रायव्हर म्हणून नोकरी सुरू केली. त्याच्या डोक्यावर लावलेले टाके ढिले झाल्याने त्याला पुन्हा वेदना सुरू झाल्या आणि आंशिक रूपाने त्याला स्मृतिभ्रंशही झाला. अशा वेळी एका हितचिंतकाने त्याला योगासने करण्याचा सल्ला दिला.

हा सल्ला मानून त्याने योगासने करण्यास सुरुवात केली व अनेक वर्षांच्या सरावानंतर तो हळूहळू बरा झाला. कोरोना काळात त्याची नोकरी गेेली होती. अशा वेळी एका खासगी शाळेत त्याने योगशिक्षक म्हणून नोकरी मिळवली. लॉकडाऊनच्या काळातच त्याने हातावर उभे राहून वजन उचलण्याचा सराव केला. त्याने सहा किलो वजनाच्या दोन विटांपासून सुरुवात केली. आता तो शंभर किलोपेक्षाही अधिक वजन उचलू शकतो.

Back to top button