पिंपरी : चौथ्या आठवड्यातही मेट्रो प्रवासाला पसंती | पुढारी

पिंपरी : चौथ्या आठवड्यातही मेट्रो प्रवासाला पसंती

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराचे दर्शन करण्याठी पुणे मेट्रोतून प्रवासाला मोठी पसंती दिली आहे. चौथा आठवडा सुरू झाला तरी, मेट्रोतून सहकुटुंब प्रवास करण्याची क्रेझ कायम आहे. शनिवारी (दि.19) आणि रविवारी (दि.20) साप्ताहिक सुटीच्या दिवशी मेट्रो अक्षरश: भरून वाहत आहे. स्टेशन व परिसराला जत्रेचे स्वरूप येत आहे.

पिंपरी-चिंचवड व पुणे शहर अशी मेट्रो 1 ऑगस्टपासून सुरू झाली. पहिल्या दिवसापासूनच पिंपरी ते सिव्हिल कोर्ट, पिंपरी ते वनाज आणि पिंपरी ते रूबी हॉल या मार्गावर मेट्रोने प्रवास करण्यासाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: सुटीच्या दिवशी मेट्रो नागरिकांनी भरून वाहत आहे. सध्या सकाळी सातऐवजी सहाला मेट्रो सुरू होत आहे.

कामाला जाणारे चाकरमानी तसेच, व्यावसायिकही मेट्रोला पसंती देत आहेत. मेट्रोची क्रेझ अद्याप कायम असल्याने तसेच, मेट्रोतून पिंपरी-चिंचवड व पुणे शहराचे सौदर्य पाहण्यासाठी या सफरीला पसंती दिली जात आहे. चकाचक स्टेशन पाहून नागरिक हरखून जात आहेत.

गर्दीवर नियंत्रणासाठी सुरक्षारक्षकांची कसरत

उन्नत व भुयारी मार्गातून प्रवासांचा आनंद घेण्यात येत आहे. प्रतिसाद मोठा असल्याने रात्री अकरानंतरही मेट्रो धावत आहे. गर्दी वाढल्याने नागरिकांवर नियंत्रण करण्यासाठी सुरक्षारक्षकांना कसरत करावी लागत आहे. त्या संदर्भात स्पीकरवर वारंवार सूचना देण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. स्टेशन परिसरात लावलेल्या वाहनांमुळे पदपथ व रस्ते फुल्ल झाले आहेत. मेट्रोची सफर झाल्यानंतर परिसरातील हॉटेल व खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉलवर नागरिक ताव मारताना दिसत आहेत. पार्किंगसाठी जवळपास जागा न मिळाल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली.

तिकीट स्कॅन होण्यास विलंब

गर्दी झाल्याने काही स्टेशनवर तिकीटांसाठी रांगा लागत आहेत. डिजीटल पेमेंटद्वारे व ऑनलाइन तिकीट काढण्यास बराच वेळ जात आहे. अनेक ठिकाणी तिकीट स्कॅन होत नसल्याने प्रवेश मिळत नाही. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

  • उन्नत व भुयारी मार्गातून प्रवासांचा आनंद
  • वाहनांमुळे पदपथ व रस्ते फुल्ल
  • परिसरातील हॉटेल व खाद्यपदार्थ स्टॉलवर गर्दी
  • पार्किंगसाठी जागा न मिळाल्याने नाराजी

हेही वाचा

निर्यात शुल्कामुळे कांदा गडगडला ; कांदा खरेदीबाबत व्यापार्‍यांकडून हात आखडता

श्रीरामपूर : आयोगामुळे देशीगायी संवर्धनास मदत होणार : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

Vijayakumar Gavit : मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायसारखे डोळे होतात, मुलीही पटतात: विजयकुमार गावित

Back to top button