शरद पवार यांना कधीही एकहाती सत्ता मिळाली नाही : दिलीप वळसे पाटील | पुढारी

शरद पवार यांना कधीही एकहाती सत्ता मिळाली नाही : दिलीप वळसे पाटील

मंचर : पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांच्या उंचीचा राज्यात एकही नेता नाही असं आपण म्हणतो. परंतु राज्यातील जनतेने एकदाही शरद पवार यांना पूर्ण सत्ता दिली नाही. आपण 60-70 आमदारच निवडून आणू शकलो. इतर राज्यांमध्ये अनेक स्थानिक पक्षांनी त्या राज्यात सत्ता मिळवली, अशी टीका सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रविवारी केली. सध्या अस्तित्वात असलेले दोन्ही राष्ट्रवादी पक्षच असून अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेईल, असेही त्यांनी सांगितले. काही गोष्टी उघडपणे बोलायच्या नसतात.

2019 साली आघाडीला बहुमत मिळाले नाही. परंतु तरीही आपण सत्तेत आलो. सत्तेत आल्यानंतर कोरोनाच्या कालखंडामध्ये दोन वर्षे निघून गेली. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. आपण विरोधी पक्षात गेलो. आपल्या पक्षाच्या अनेक नवीन निवडून आलेल्या आमदारांना
कोरोनामुळे निधी देता आला नाही व विरोधी पक्षात गेल्यावर निधी मिळणे कठीण झाले. म्हणून या आमदारांची भूमिका आम्ही शरद पवार यांच्याकडे मांडली. परंतु त्यांनी विरोध केला. म्हणून आपणाला हा निर्णय घ्यावा लागला. आपण भाजपप्रणीत आघाडीत गेलो आहोत. भाजपमध्ये नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या माझ्यावर आरोप केला जातो की ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्सची नोटीस आली म्हणून मी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु मला कुठल्याही एजन्सीची नोटीस आलेली नाही. जर कोणाला त्या नोटीस सापडल्या तर त्यांनी त्या माझ्याकडे आणाव्यात. एकही नोटीस आलेली असेल तर मी उद्याच आमदारकीचा राजीनामा देईन. माझ्या द़ृष्टीने मंत्रिपद, मान या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. माझ्यासाठी तालुक्यातील जनतेचे हित महत्त्वाचे आहे, असे वळसे-पाटील म्हणाले.

हेही वाचा :

भारताची मालिकेत विजयी आघाडी; दुसर्‍या टी-20 सामन्यात आयर्लंडचा 33 धावांनी पराभव

पहिला श्रावण सोमवार : परळीत पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई; जय्यत तयारी

Back to top button