डब्लिन : वृत्तसंस्था भारताने दुसर्या टी-20 सामन्यात आयर्लंडचा 33 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी
विजयी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करणार्या भारताने आयर्लंडला विजयासाठी 186 धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीर आणि उपकर्णधार ऋतुराज गायकवाडने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर संजू सॅमसनने 26 चेंडूंत 40 धावा चोपल्या. संजू आणि ऋतूच्या 71 धावांच्या भागीदारीनंतर रिंकू सिंगने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय डावात धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने स्लॉग ओव्हरमध्ये 21 चेंडूंत 38 धावा करत भारताला 5 बाद 185 धावांवर पोहोचवले. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आयर्लंडने सलामीवीर अँड्र्यू बारबिर्नेच्या झुंजार 72 धावांच्या जोरावर 152 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस नियमानुसार 2 धावांनी विजय मिळवला होता. मालिकेतील तिसरा सामना बुधवारी होणार आहे.
आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला. सलामीवीर यशस्वी जैस्वालने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. त्याला दुसर्या बाजूने ऋतुराज गायकवाड चांगली साथ देत होता. मात्र पॉवर प्लेमध्येच क्रेग यंगने यशस्वीला 18 धावांवर बाद केले. त्यानंतर आललेला तिलक वर्मा 2 चेंडू खेळून माघारी परतला. त्याला बॅरी मॅककार्थीने बाद केले. पाठोपाठ दोन विकेटस् पडल्यानंतर आलेल्या संजू सॅमसन आणि उपकर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी भारताचा डाव सावरला.
या दोघांनी तिसर्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचली. यामुळे 12 व्या षटकातच भारताचे शतक धावफलकावर लागले. या भागीदारीत आक्रमक फलंदाजीची जबाबदारी संजू सॅमसन निभावत होता तर ऋतुराज त्याला साथ देत होता. दोघेही आपले अर्धशतक पूर्ण करण्याच्या तयारीत असतानाच बेंजामिन व्हाईटने 26 चेंडूंत 40 धावा करणार्या संजूचा त्रिफळा उडवला. संजू बाद झाल्यानंतर ऋतुराजने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत आक्रमक फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. मात्र बॅरी मॅककार्थीने ऋतुराजला 58 धावांवर बाद करत भारताला मोठा धक्का दिला. ऋतुराज बाद झाल्यानंतर रिंकूने स्लॉग ओव्हरमध्ये तुफान फटकेबाजी केली. रिंकूने आधी ऋतुराज आणि नंतर शिवम दुबे यांच्या साथीने शेवटच्या दोन षटकांत तब्बल 42 धावा चोपत भारताला 20 षटकांत 5 बाद 185 धावांपर्यंत पोहोचवले. रिंकूने 21 चेंडूंत 38 तर शिवम दुबेने 16 चेंडूंत नाबाद 22 धावा केल्या.
भारताचे 186 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आयर्लंडने आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न प्रसिद्ध कृष्णाने हाणून पाडला. त्याने स्टिर्लिंग आणि टकर यांना शून्यावर बाद केले. आयर्लंडचा सलामीवीर अँड्र्यू बलबिर्नेने झुंजार अर्धशतकी खेळी करत संघाला शतकी मजल मारून दिली; परंतु त्याला दुसर्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. कुर्टिस कॅम्फेर (18), जॉर्ज डॉकरेल (13) मार्क अडेर (23) यांचेही प्रयत्न अपुरे पडले. अँड्र्यू बलबिर्ने सहाव्या विकेटच्या रूपात तंबूत परतला. त्याने 51 चेेंडूंत 72 धावा करताना 5 चौकार आणि 4 षटकार ठोकले, पण त्याच्या बाद होण्याने आयलर्र्ंडच्या आशा संपुष्टात आल्या. त्यांचा डाव 20 षटकांत 8 बाद 152 धावांवर थांबला. भारताकडून रवी बिष्णोई आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या.