शाळेला मुख्याध्यापकच नाही, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; पुण्यातील धक्कादायक प्रकार | पुढारी

शाळेला मुख्याध्यापकच नाही, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात; पुण्यातील धक्कादायक प्रकार

खेड शिवापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिवापूर (ता. हवेली) जिल्हा परिषद शाळेला गेली दोन वर्षे झाले मुख्याध्यापकच मिळाला नसून एका शिक्षकाची सुद्धा कमी आहे. त्यामुळे पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.
शिवापूर शाळेत पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थ्यांचा पट जवळपास 180 आहे. त्यामुळे नियमानुसार सात शिक्षक व एक मुख्याध्यापक अशी मिळून आठ जणांची गरज आहे. मात्र, शाळेत पाच ते सहाच शिक्षक असल्याने कोणत्या वर्गावर कोणत्या शिक्षकाने शिकवायचे हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. मुख्याध्यापक व एक उपशिक्षक पद रिक्त आहे.

याशिवाय आर्वीतील शाळेमध्ये मुख्याध्यापक, कल्याण शाळेत दोन शिक्षक, खेड शिवापूरमध्ये मुख्याध्यापक व एक पदवीधर, श्रीरामनगरमध्ये दोन उपशिक्षक, गोगलवाडीमध्ये एक शिक्षक, गाऊडदरा येथे एक शिक्षक अशी पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. संबंधित शाळा प्रशासनाकडून रिक्त पदे भरण्याबाबत मागणी केली जात आहे. मात्र, याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असून, काहीही घेणे-देणे नसल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांसह शिक्षकांची मानसिकता ढासळत चालली

ज्या शाळेत सात वर्गखोल्या आहेत आणि या शाळांमध्ये दोन पदे रिक्त आहेत, अशा शाळांमध्ये शिक्षकाने मुख्याध्यापकाचे काम करून दोन वर्ग सांभाळायचे. एकाने ऑनलाइनची कामे करून दोन वर्ग सांभाळायचे, तर दुसर्‍या शिक्षकाने तीन वर्ग सांभाळायचे. असा प्रकार सध्या सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांवर ताण तर येतोच, मात्र याबरोबरच विद्यार्थ्यांची मानसिकता ढासळत चालली असल्याचे दिसून येत आहे.

सध्या संच मान्यता दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचप्रमाणे निवृत्त शिक्षक तात्पुरती भरती प्रक्रियेद्वारे रिक्त जागा शासनाच्या नियमाप्रमाणे लवकरच भरण्यात येतील. याबाबतचे शासनाकडे परिपत्रक काढले आहे.

– निर्मला म्हेत्रे, गटशिक्षण अधिकारी, हवेली

हेही वाचा

पुणेकरांना आधार : पानशेत धरण भरून वाहू लागले

सांगवी : सोमंथळी बॅरेज ठरतोय शेतकर्‍यांना वरदान

नवी सांगवी : अग्निशमन केंद्राअभावी वेळेत मिळेना मदत

Back to top button