सांगवी : सोमंथळी बॅरेज ठरतोय शेतकर्‍यांना वरदान | पुढारी

सांगवी : सोमंथळी बॅरेज ठरतोय शेतकर्‍यांना वरदान

अनिल तावरे

सांगवी(पुणे) : अल निनोच्या प्रभावामुळे बहुतांश ठिकाणी मान्सूनपूर्व किंवा मान्सूनचा एकही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, शेतातील पिके डोळ्यांदेखत जळून जाताना पाहण्याशिवाय शेतकर्‍यांपुढे पर्यायच उरला नाही. परंतु बारामती तालुक्यातील सांगवी परिसरातील निरा नदीच्या पाण्यामुळे शेतीला जीवदान मिळाले आहे. एकीकडे बहुतांश भागात निरा नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. याच भागात सोमंथळी बॅरेज असल्याने अशा परिस्थितीमध्ये बॅरेजमधील पाण्याचा सध्याच्या परिस्थितीमध्ये उपयोग होत असल्याने सोमंथळी बॅरेज सध्यातरी वरदान ठरत आहे.

गेल्या 15 वर्षांपूर्वी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पातील सोमंथळी बॅरेज उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्या वेळी हा बॅरेज होऊ नये यासाठी अनंत अडचणी येत होत्या. परंतु विविध अडचणींवर मात करत हा प्रकल्प उभा करण्यात आला. दरवर्षी या बॅरेजमध्ये पाणी अडविण्यात येते. यंदाच्या पावसाळ्यात या भागात एकही समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना बॅरेज खालच्या बंधांर्‍यांसाठी तो वरदान ठरताना दिसत आहे.

निरा नदीवरील शिरवली येथील बंधारा केव्हाच कोरडा ठणठणीत पडला असता. परंतु शिरवली बंधार्‍यात सोमंथळी बॅरेजमधील पाणी आल्यामुळे नदीकाठच्या शेतातील पिकांना जीवदान मिळण्यासाठी मदत झाली आहे. सध्या शिरवली बंधार्‍यावर अवलंबून असणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतातील पिके वाचण्यासह नवीन उसाच्या लागवडीही केल्या आहेत. निरा डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या बहुतांश शेतकर्‍यांनी निरा नदीवरून जलवाहिनी केल्या आहेत. त्याही शेतकर्‍यांना सोमंथळी बॅरेज व शिरवली बंधार्‍याचा दुहेरी फायदा होताना दिसत आहे.

दै. ‘पुढारी’चे योगदान

सोमंथळी बॅरेजची उभारणी करताना 15 वर्षांपूर्वी अनेक सामाजिक, राजकीय व काही व्यक्तींचा विरोध होता. परंतु हा बॅरेज किती महत्त्वाचा आहे, त्याचा भविष्यात काय फायदा होईल याबाबत दै. ‘पुढारी’ने त्या वेळी सचित्र अनेक वृत्त प्रकाशित करत जनजागृती केली होती. सध्या याच अशा दुष्काळसदृश परिस्थितीतून जाताना दै. ‘पुढारी’ने दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक ऐकायला मिळत आहे.

हेही वाचा

नानगाव : भीमा नदीपट्ट्यात वाढताहेत बिबट्यांची कुटुंबे

नवी सांगवी : अग्निशमन केंद्राअभावी वेळेत मिळेना मदत

छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगल्‍या सत्ताधारी-विरोधी पक्षाच्या आरोपांच्या फैरी

Back to top button