पुणेकरांना आधार : पानशेत धरण भरून वाहू लागले | पुढारी

पुणेकरांना आधार : पानशेत धरण भरून वाहू लागले

दत्तात्रय नलावडे

वेल्हे(पुणे) : आठ दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. असे असले तरी पानशेत-वरसगाव खोर्‍यात अधुनमधून कोसळणार्‍या श्रावण सरींमुळे जिल्ह्यातील शेतीसह पुणेकरांना आधार मिळाला आहे. श्रावण सरींमुळे शेती व पिण्यासाठी मुबलक पाणी सोडूनही गेल्या आठ दिवसांपासून खडकवासला धरणसाखळीचा पाणीसाठा 90 टक्क्यांवर कायम आहे.

खडकवासला-सिंहगड भागात उन्हाळा सुरू आहे. मात्र, रायगड जिल्ह्यालगतच्या श्रावण सरींमुळे पानशेत धरण 100 टक्के भरून वाहू लागले आहे. सोमवारी (दि. 14) सकाळी सहा वाजता खडकवासला धरणसाखळीत 26.45 टीएमसी म्हणजे 90.75 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागील सोमवारी (दि. 7) धरण साखळीत 25.91 टीएमसी म्हणजे 88.89 टक्के पाणीसाठा होता.

पानशेत-वरसगाव धरण क्षेत्रातील रायगड जिल्ह्यालगतच्या पट्ट्यात श्रावण सरींसह रिमझिम सुरू आहे. उघडीपीनंतर ऊनही पडत आहे. मात्र, थोड्या वेळानंतर जोरदार वार्‍यासह श्रावण सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणसाठ्यात अल्प प्रमाणात का होईना भर पडत आहे. परिणामी, गेल्या आठ दिवसांपासून धरणसाखळी 90 टक्क्यांवर कायम आहे.

वरसगावमध्ये 91 टक्क्यांहून अधिक साठा झाला आहे. पानशेतमधून पाणी सोडूनही खडकवासला धरणातील पाण्याची पातळी 75 टक्क्यांवरच आहे. खडकवासला, सिंहगड भागात उन्हाळा सुरू असल्याची स्थिती आहे. त्यामुळे ओढ्या-नाल्यांतील पाण्याची आवक जवळपास ठप्प झाली आहे. चार धरणांच्या खडकवासला धरणसाखळीत गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दोन टीएमसी कमी साठा आहे.

गेल्या वर्षी आजच्या दिवशी 14 ऑगस्ट 2022 रोजी धरण साखळीत 28.72 टीएमसी म्हणजे 98.53 टक्के पाणी होते.
रविवारी (दि. 13) सकाळी सहा ते सोमवारी (दि. 14) सकाळी सहापर्यंतच्या टेमघर येथे 5, वरसगाव व पानशेत येथे प्रत्येकी 10 मिलीमीटर पाऊस पडला. तर खडकवासलात पावसाची नोंद झाली नाही. खडकवासला, सिंहगड भागात पावसाची नोंद झाली नाही.

पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणसाठ्यातील वाढ मंदावली आहे. पानशेत-वरसगाव खोर्‍यातील श्रावणी सरींमुळे थोडीफार आवक सुरू आहे. त्यामुळे पानशेत धरण 100 टक्के भरले आहे. श्रावण सरींमुळे धरणसाखळीतील पाणीपातळी 90 टक्क्यांवर स्थिर आहे.

– मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

पानशेत 100 टक्के भरल्याने रविवारी (दि. 13) सायंकाळी 7 पासून वीजनिर्मिती सांडव्यातून पाणी सोडले जात आहे. सध्या 600 क्सुसेक विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रात तुरळक पाऊस आहे त्यामुळे पाण्याची आवक कमी झाली आहे.

– अनुराग मारके, शाखा अभियंता, पानशेत धरण प्रकल्प.

हेही वाचा

मंचर : चांडोली तुकानाना चौक ते पिंपळगाव रस्ता खड्डेमय

सांगवी : सोमंथळी बॅरेज ठरतोय शेतकर्‍यांना वरदान

नानगाव : भीमा नदीपट्ट्यात वाढताहेत बिबट्यांची कुटुंबे

Back to top button