अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवणार; कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची ग्वाही | पुढारी

अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवणार; कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची ग्वाही

सांगली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याची कार्यवाही तातडीने केली जाईल, अशी ग्वाही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या पत्राला सिद्धरामय्या यांनी उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकानेही पाटकर यांच्याशी थेट संपर्क साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याची माहिती दिली. कृष्णा नदी महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण व प्रभाकर केंगार यांनी ही माहिती दिली.

अलमट्टी धरणामध्ये पाणी साठवण्याची उंची आता पूर्ण म्हणजेच 519.55 मीटरपर्यंत गाठली गेली आहे. धरणात सध्या 122.32 टीएमसी साठा आहे. धरणामध्ये पाण्याची रोज 48 हजार 212 क्युसेक आवक सुरू आहे. मात्र धरणातून फक्त 25 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अजून पावसाळा पुढे आहे. 15 ते 20 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊ शकतो. पाऊस अचानक वाढला तर कृष्णा खोर्‍यात महापुराची परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे आम्ही श्रीमती पाटकर यांच्याशी संपर्क साधून कर्नाटक शासनाबरोबर संवाद साधावा, अशी विनंती केली होती, अशी माहिती दिवाण व केंगार यांनी दिली. मेधा पाटकर यांनी 5 ऑगस्टरोजी सिद्धरामय्या यांना एक पत्र ई-मेलने पाठवले. त्या पत्राचे त्यांना 8 ऑगस्ट रोजी उत्तरही आले.

विषय सामंजस्याने सोडवू : सिद्धरामय्या

मेधा पाटकर यांच्या पत्राची कर्नाटक शासनाने अतिशय गंभीर दखल घेतली आहे. आम्ही केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार धरणांचे परिचलन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आंतरराज्य विषय सामंजस्याने आणि समन्वयाने सोडवण्याचा आमचा आग्रह असतो. त्यामुळे मी संबंधित विभागाला याबाबत तातडीने माहिती घेऊन अलमट्टी धरणामधून विसर्ग वाढवणे गरजेचे असेल तर तशी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संदर्भात शासनाकडून यापुढेही वेळोवेळी आपल्याशी संपर्क साधला जाईल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाटकर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Back to top button