नाशिक : धोंड्याच्या महिन्यामुळे चोरांची दिवाळी | पुढारी

नाशिक : धोंड्याच्या महिन्यामुळे चोरांची दिवाळी

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

धोंड्याच्या महिन्यासाठी भाविकांच्या उसळलेल्या गर्दीचा फायदा घेत बसमधील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला जाण्याचे प्रकार दररोज घडत आहेत. विशेष म्हणजे चोरी करणाऱ्या महिला असून, या टोळीला पकडण्याची मागणी महिला भाविकांनी केली आहे.

शनिवारी (दि. 5) गंगापूर रोड येथून आलेल्या महिला भाविकाचे एक लाख रुपयांचे मंगळसूत्र चोरीस गेले. रविवारी (दि. 6) महात्मानगर येथून आलेल्या महिलेच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची चेन आणि तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या महिलेच्या गळ्यातील तीन ग्रॅमचे मंगळसूत्र असे एकूण 55 हजार रुपयांचे सोने लांबवण्यात आले. सोमवारी (दि. 7) ठाणे येथून आलेल्या भाविक महिलेच्या गळ्यातील 11 ग्रॅम वजनाची 37 हजारांची सोन्याची पोत चोरीला गेली.

विशेष म्हणजे चोरट्यांनी सिंहस्थ बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत हात साफ करत आहे. शनिवार ते सोमवार शहरातील बसस्थानक गावाबाहेर सिंहस्थ बसस्थानकात हालवण्यात येते. तेथे असलेला चिखल आणि अव्यवस्थेमुळे महिला प्रवासी बस पकडण्यासाठी धावपळ करतात. साहजिकच गळ्यातील दागिन्यांकडे काहीसे दुर्लक्ष होते. तेवढ्या वेळात चोरट्या महिला त्याचा फायदा घेत दागिने लंपास करत आहेत.


चोरीचे चित्रण, तरीही पोलिस शांतच

दरम्यान, सिटीलिंक बसमध्येदेखील चोऱ्या होत आहेत. शेजारच्या महिलेच्या पर्समध्ये हात टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे एका सजग नागरिकाने व्हिडिओ चित्रण केले. मात्र, तरीही त्या महिलांना ताब्यात घेतलेले नाही. पालखी प्रस्थानाच्या वेळेस काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, नंतर त्यांना सोडून देण्यात आले. जून 2023 पासून बसस्थानकावर सातत्याने महिलांच्या सोनसाखळ्या चोरी होत आहेत. मात्र, त्याचा तपास लागलेला नाही.

Back to top button