Stock Market Closing Bell | शेअर बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स ४८० अंकांनी वाढून बंद, ‘या’ शेअर्सची चमकदार कामगिरी | पुढारी

Stock Market Closing Bell | शेअर बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स ४८० अंकांनी वाढून बंद, 'या' शेअर्सची चमकदार कामगिरी

पुढारी ऑनलाईन : तीन दिवसांच्या विक्रीच्या माऱ्यानंतर आज शुक्रवारी शेअर बाजार सावरला. आशियातील सकारात्मक संकेतांचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीत व्यवहार केला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढून ६५,७६८ वर पोहोचला. त्यानंतर सेन्सेक्स ४८० अंकांच्या वाढीसह ६५,७२१ वर स्थिरावला. तर निफ्टी १३५ अंकांनी वाढून १९,५१७ वर बंद झाला.

बाजारातील तेजीत आयटी आणि फार्मा स्टॉक्स आघाडीवर राहिले. (Stock Market Closing Bell) तर ऑटो स्टॉक्स घसरले. क्षेत्रीय पातळीवर फार्मा आणि आयटी निर्देशांक प्रत्येकी १ टक्के आणि बँक, कॅपिटल गुड्स आणि मेटल प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले. मात्र, ऑटो आणि पॉवर स्टॉक्समध्ये विक्री दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढले.

‘हे’ शेअर्स तेजीत

सेन्सेक्स काल ६५,२४० वर बंद झाला होता. तो आज ६५,४५३ वर खुला झाला. त्यानंतर सेन्सेक्सने ६५,७८७ अंकांपर्यंत वाढ नोंदवली. सेन्सेक्सवर इंडसइंड बँक (१,४११ रुपये) आणि टेक महिंद्रा (१,१७६ रुपये) यांचे शेअर्स ३ टक्क्यांनी वाढले. विप्रोचा शेअरही २ टक्क्यांहून अधिक वाढून ४०९ रुपयांवर पोहोचला. भारती एअरटेल, एचसीएल टेक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स, टीसीएस, एलटी हे शेअर्स सुमारे १ टक्क्यांहून अधिक वाढले. इन्फोसिस, कोटक बँक, बजाज फायनान्स हे शेअही वधारले. दरम्यान, एसबीआयचा शेअर सेन्सेक्सवर टॉप लूजर ठरला. हा शेअर ३ टक्के घसरून ५७२ रुपयांवर आला. एनटीपीसी, टाटा मोटर्स, मारुती हे शेअर्सही घसरले.

पेटीएमचे शेअर्स वधारले

पेमेंट्स प्लॅटफॉर्म पेटीएम (Paytm) चालवणाऱ्या फिनटेक वन ९७ कम्युनिकेशन्सचे शेअर्स (Shares of fintech One 97 Communications) शुक्रवारी बीएसईवर ४ टक्के वाढून ७९७ रुपयांवर पोहोचले. कारण जुलैमध्ये सरासरी मासिक व्यवहार करणारे यूजर्स १९ टक्क्यांनी वाढल्याचे सांगितल्यानंतर पेटीएमचे शेअर्स वाढले.

झोमॅटो शेअरची चमकदारी कामगिरी

ऑनलाइन फूड डिलिव्हरी एग्रीगेटर झोमॅटो (Zomato) चा शेअर आज १० टक्क्यांनी वाढून ९५ रुपयांवर पोहोचला. हा शेअर आज ५२ आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर गेला. झोमॅटोने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २ कोटींचा नफा नोंदवला. तर त्यांचा महसूल १,४१४ कोटींवरून २,४१६ कोटी रुपयांवर पोहोचला. झोमॅटोने तोट्यातून बाहेर पडत नफा कमावला आहे. या पार्श्वभूमीवर झोमॅटोचे शेअर्स वधारले आहेत. दरम्यान, जून तिमाहीच्या नफ्यात ५० टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवल्यानंतर आयशर मोटर्सचे शेअर्स ३ टक्क्यांनी वधारले. (Stock Market Updates)

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा ओघ

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) कडील शुक्रवारच्या आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) जुलैमध्ये निव्वळ आधारावर ४६६.१८ अब्ज रुपये (५.६३ अब्ज डॉलर) किमतीचे भारतीय शेअर्स खरेदी केले. जूनमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर्सची झालेली खरेदी ४७१.५ अब्ज रुपयांची होती. जूनच्या तुलनेत जुलैमधील गुंतवणूक किचिंत कमी राहिल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येते. दरम्यान, NSE डेटानुसार परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) गुरुवारी ३१७ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) १,७२९ कोटी रुपयांचे खरेदी केले. (Stock Market Closing Bell)

हे ही वाचा :

Back to top button