Statue of Unity : ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’कडे पर्यटकांचा वाढता ओघ | पुढारी

Statue of Unity : ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’कडे पर्यटकांचा वाढता ओघ

अहमदाबाद : गुजरातच्या केवडियाजवळ देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा तब्बल 182 मीटर म्हणजेच 597 फूट उंचीचा भव्य पुतळा उभा आहे. या पुतळ्याला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाजवळ असलेल्या या भव्य पुतळ्याला पाहण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. दरवर्षी या पुतळ्याला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या वाढतच असल्याचे दिसून आले आहे.

ऑक्टोबर 2013 मध्ये या प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली होती. या पुतळ्याचे डिझाईन प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांनी बनवलेले असून 31 ऑक्टोबर 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर देश-विदेशातील पर्यटकांसाठी हा पुतळा एक मोठेच आकर्षण बनला.

अनावरणानंतर केवळ चारच वर्षांमध्ये म्हणजे 2022 मध्ये इथे येणार्‍या पर्यटकांच्या संख्येने एक कोटीचा आकडा पार केला. विशेष म्हणजे, कोरोना काळात हे ठिकाण पर्यटकांसाठी बंद होते व तरीही नंतरच्या काळात पर्यटकांच्या संख्येने हा विक्रम घडवून आणला. हा पुतळा पाहण्यासाठी रोज हजारो लोक येत असतात. या ठिकाणी पुतळ्याशिवाय अन्यही अनेक उपक्रम पर्यटकांसाठी सुरू केलेले आहेत.

Back to top button