कोल्हापूर :’एक रुपयात पिकविमा योजने’तून महत्त्वाची पिके वगळली | पुढारी

कोल्हापूर :'एक रुपयात पिकविमा योजने'तून महत्त्वाची पिके वगळली

प्रवीण ढोणे

राशिवडे: केवळ एक रुपयामध्ये पिकविमा या योजनेमध्ये जिल्ह्यातील  वेगवेगळ्या तालुक्यामध्ये होणारी भात, ज्वारी, नाचणी, भुईमुग आणि सोयाबीन ही पिकेच या योजनेतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे हा पिकविमा काय कामाचा?  असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे. तरी वगळलेल्या पिकांचा या योजनेमध्ये समाविष्ट करून सरसकट सर्वच पिकांना विमा योजनेचा लाभ देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक योजनेतर्गत  सर्वसमावेशक पीक विमा योजना सुरु केली आहे.  एक रुपयामध्ये पिक विमा या योजनेचा उद्देश जरी चांगला असला तरी या योजनेमधून ठराविक पिके वगळण्यात आली आहेत. या योजनेमध्ये सर्व पिकांचा समावेश होणे आवश्यक असताना भात, ज्वारी, नाचणी आणी सोयाबीन पिकांना काही तालुक्यातून वगळण्यात आले आहे.

नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, कीड, रोग आदी नैसर्गिक कारणासाठी हा विमा लागू होणार आहे. नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना अर्थिक स्थैर्य देणे, कृषी क्षेत्रामध्ये पतपुरवठा सातत्य ठेवणे, स्पर्धात्मकतेत वाढीचा हेतू साध्य होण्यास मदत, आधी या योजनेमागचा उद्देश आहे. परंतु या योजनेसाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील ठराविक पिके वगळण्यात आली आहेत. शिरोळ तालुक्यात भातपिक, हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, शाहुवाडी, करवीर,कागल, गडहिंग्लज, आजरा तालुक्यात  ज्वारी तर हातकणंगले, शिरोळ तालुक्यामध्ये  नाचणी तर शाहुवाडी, गगनबावडा आणी राधानगरी तालुक्यात सोयाबीन पिकाला या योजनेतून वगळण्यात आले आहे. तर गगनबावडा तालुक्यातून भुईमुग पिकाला वगळण्यात आले आहे.

स्थानिक तालुकास्तरावर घेतल्या जाणाऱ्या पिकांची नोंद, माहिती शासन स्तरावर जाणे महत्वाचे होते. तर कोणत्या पिकांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला? यामध्ये कोणत्या त्रुटी आहेत? याची लोकप्रतिनिधींनी माहिती घेणे गरजेचे होते. त्यामुळे आता सुधारित पिकविमा योजनेमध्ये वगळलेल्या पिकांचा समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

हेही वाचा 

Back to top button