Kolhapur Panchganga water level | कोल्हापूर जिल्ह्यात संततधार कायम, पंचगंगेची पाणी पातळी ४१ फुटांवर | पुढारी

Kolhapur Panchganga water level | कोल्हापूर जिल्ह्यात संततधार कायम, पंचगंगेची पाणी पातळी ४१ फुटांवर

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन; जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. विशेषतः धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज शुक्रवारी सकाळी ८ वाजता राजाराम बंधाऱ्याजवळची पाणी पातळी ४१ फुटांवर पोहोचली. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आणि धोका पातळी ४३ फूट आहे. (Kolhapur Panchganga water level) दरम्यान, जिल्ह्यातील ७० बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यात काल गुरुवारी पावसाचा जोर कायम राहिला. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. राधानगरीचे पाच स्वयंचलित दरवाजे खुलेच असून, पावसाने पंचगंगेच्या पातळीत पुन्हा वाढ सुरू झाली आहे. मांडुकलीजवळ पाणी आल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा बंद झाला आहे. २७ मार्गांवरील एस.टी. सेवा बंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कोल्हापूर शहरासह २७ गावांतील सुट्टी दिलेल्या शाळा शुक्रवारपासून सुरू करा. पावसाचा अंदाज घेऊन शुक्रवारपासून स्थलांतरित नागरिकांना स्वगृही पाठवा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याचेही आदेश त्यांनी दिले.

राधानगरीसह कासारी, कुंभी, कोदे धरणांतून विसर्ग सुरू असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ सुरू झाली आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून ४०.५ फुटांवर असणारी पाणी पातळी सतरा तासांनी गुरुवारी सकाळी दहा वाजता ४०.६ फुटांवर गेली. रात्री नऊ वाजेपर्यंत ती ४०.८ फूट इतकी झाली होती. तर शुक्रवारी सकाळी ती ४१ फुटांवर पोहोचली. (Kolhapur Panchganga water level)

पंचगंगेचे पाणी शुक्रवार पेठेतील जामदार क्लबजवळ आले आहे. शहरातील काही भागांत नागरी वस्तीलगत पाणी आले आहे. यासह आंबेवाडी-चिखली, चिखली-वरणगे, कोल्हापूर-पन्हाळा या मार्गांवर रस्त्यालगत पाणी आले आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरील सेवा रस्त्यावर पुराचे पाणी आले. यामुळे या रस्त्यावरून सांगली फाट्याकडे जाणारी वाहतूक मुख्य महामार्गावरून सुरू होती.

दरम्यान, पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर गुरुवारी दुपारी कोल्हापूर दौर्‍यावर आले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी २४ तासांत जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पावसाचा जोर पाहून विसर्गाचे चांगल्या प्रकारे संनियंत्रण करा, अशा सूचना त्यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या. पावसाचा अंदाज घेऊन शुक्रवापासून पूरबाधित भागातील बंद ठेवण्यात आलेल्या शाळा पूर्ववत सुरू करा. सतर्कता म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात, यामुळे ज्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले होते, त्यांना पावसाचा अंदाज घेऊन शुक्रवारी स्वगृही पाठवा, असेही आदेश केसरकर यांनी दिले.

खबरदारीचा उपाय म्हणून बालिंगा येथील जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. याबाबत नागरिकांची मागणी व गैरसोय होऊ नये म्हणून केसरकर यांनी आवश्यक तपासण्या करून एकेरी वाहतूक सुरू करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. पुलावरील वाहतूक सुरू करताना त्या ठिकाणी आवश्यक बंदोबस्तासह वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार या पुलावरून गुरुवारी रात्रीपासूनच वाहतूक सुरू करण्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pudhari (@pudharionline)

हे ही वाचा :

Back to top button