कोल्हापूर : पाऊस वाढला; पूर पातळीही वाढली | पुढारी

कोल्हापूर : पाऊस वाढला; पूर पातळीही वाढली

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा जोर वाढला. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. राधानगरीचे पाच स्वयंचलित दरवाजे खुलेच असून, पावसाने पंचगंगेच्या पातळीत पुन्हा वाढ सुरू झाली आहे. मांडुकलीजवळ पाणी आल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा बंद झाला आहे. जिल्ह्यातील 81 बंधार्‍यांवर पाणी असून, 64 मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. 27 मार्गांवरील एस.टी. सेवा बंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कोल्हापूर शहरासह 27 गावांतील सुट्टी दिलेल्या शाळा शुक्रवारपासून सुरू करा. पावसाचा अंदाज घेऊन शुक्रवारपासून स्थलांतरित नागरिकांना स्वगृही पाठवा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याचेही आदेश त्यांनी दिले.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला. सकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर धुवाँधार पाऊस सुरू होता. कोल्हापूर शहर परिसरात पावसाची संततधार सुरू होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहराच्या अनेक रस्त्यांवर पाणी साचले. जिल्ह्यातही विशेषत: धरण क्षेत्रांत मुसळधार पाऊस सुरू होता. पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

राधानगरीचे बुधवारी पाच स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. पावसाचा जोर कमी झाल्याने पहाटे चार वाजून 24 मिनिटांनी तिसर्‍या क्रमांकाचा दरवाजा बंद झाला होता. मात्र, सकाळी सात वाजल्यापासून राधानगरी धरण क्षेत्रात धुवाँधार पाऊस होत आहे. यामुळे पहाटे बंद झालेला तिसर्‍या क्रमांकाचा दरवाजा दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी पुन्हा खुला झाला. यामुळे धरणातून सध्या 8 हजार 540 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

राधानगरीसह कासारी, कुंभी, कोदे धरणांतून विसर्ग सुरू असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ सुरू झाली आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून 40.5 फुटांवर असणारी पाणी पातळी सतरा तासांनी गुरुवारी सकाळी दहा वाजता 40.6 फुटांवर गेली. रात्री नऊ वाजेपर्यंत ती 40.8 फूट इतकी झाली होती. पंचगंगेचे पाणी शुक्रवार पेठेतील जामदार क्लबजवळ आले आहे. शहरातील काही भागांत नागरी वस्तीलगत पाणी आले आहे. यासह आंबेवाडी-चिखली, चिखली-वरणगे, कोल्हापूर-पन्हाळा या मार्गांवर रस्त्यालगत पाणी आले आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरील सेवा रस्त्यावर पुराचे पाणी आले. यामुळे या रस्त्यावरून सांगली फाट्याकडे जाणारी वाहतूक मुख्य महामार्गावरून सुरू होती.

गेल्या आठ तासांत राधानगरी, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव या धरण परिसरात अतिवृष्टी झाली. तत्पूर्वी, बुधवारी सकाळी सात ते गुरुवारी सकाळी सात या गेल्या 24 तासांत वारणा (55), जंगमहट्टी (31), जांबरे (58) व आंबेओहोळ (42 मि.मी.) वगळता सर्व 11 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 34.8 मि.मी. पाऊस झाला. गगनबावड्यात 116.2 मि.मी. इतका पाऊस झाला.
कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सकाळी 1 लाख 50 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. सकाळी धरणाची पाणी पातळी 517.37 मीटरवर गेली आहे. यामुळे सायंकाळनंतर धरणातून 1 लाख 75 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर गुरुवारी दुपारी कोल्हापूर दौर्‍यावर आले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी 24 तासांत जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पावसाचा जोर पाहून विसर्गाचे चांगल्या प्रकारे संनियंत्रण करा, अशा सूचना त्यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या. पावसाचा अंदाज घेऊन शुक्रवापासून पूरबाधित भागातील बंद ठेवण्यात आलेल्या शाळा पूर्ववत सुरू करा. सतर्कता म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात, यामुळे ज्या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले होते, त्यांना पावसाचा अंदाज घेऊन शुक्रवारी स्वगृही पाठवा, असेही आदेश केसरकर यांनी दिले.

खबरदारीचा उपाय म्हणून बालिंगा येथील जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. याबाबत नागरिकांची मागणी व गैरसोय होऊ नये म्हणून केसरकर यांनी आवश्यक तपासण्या करून एकेरी वाहतूक सुरू करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. पुलावरील वाहतूक सुरू करताना त्या ठिकाणी आवश्यक बंदोबस्तासह वाहतूक सुरळीत सुरू राहण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार या पुलावरून गुरुवारी रात्रीपासूनच वाहतूक सुरू करण्यात आली.

Back to top button