न्यूयॉर्कमधील प्रदर्शनात कोल्हापूरचा वारसा! ‘द मेट’ संग्रहालयात ‘टाऊन हॉल’मधील कलाकृती | पुढारी

न्यूयॉर्कमधील प्रदर्शनात कोल्हापूरचा वारसा! 'द मेट' संग्रहालयात 'टाऊन हॉल'मधील कलाकृती

कोल्हापूर : सागर यादव

इसवी सन २०० ते इ.स. पूर्व २०० अशा सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या ऐतिहासिक वस्तूंनी परिपूर्ण अशी कोल्हापूर वस्तुसंग्रहालय म्हणजेच टाऊन हॉल म्युझियमची ओळख आहे. कलानगरी कोल्हापुरातील कलासंपन्न अशा संग्रहालयातील ऐतिहासिक वस्तू परदेशातील संग्रहालयात प्रदर्शित होणार आहेत. ( Kolhapur artefacts )

अमेरिकेतील  न्यूयॉर्क येथील द मेट (मेट्रोपोलिटीन) म्युझियम ऑफ आर्ट या संग्रहालयात दि. १७ जुलैपासून  प्राचीन बौद्ध संस्कृतीवर आधारित ‘द इव्हॉल्यूशनर ऑफ अर्ली बुद्धिष्ट आर्ट इन इंडिया’ या विषयावर प्रदर्शनास प्रारंभ झाला आहे. हे प्रदर्शन १३ नोव्हेंबर २०२३ पर्यंतआहे. यामध्‍ये जगभरातील विविध वस्तुसंग्रहालयातून बौद्ध संस्कृती संदर्भातील माहिती देणाऱ्या कलाकृतींचा समावेश आहे. या प्रदर्शनात कोल्हापूर वस्तुसंग्रहालयातील (टाऊन हॉल म्युझियम) आठ ऐतिहासिक कलाकृतींना स्थान मिळणार आहे. यात समुद्रदेवता, हत्तीवरील स्वार, जैन शुभ चिन्हे, रोमन पदक, खेळण्यातील गाडा, भांड्याचे नक्षीदार दांडे आदी वस्तूंचा समावेश असणार आहे.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयाच्या (नॅशनल म्युझियम) समन्वयाने जागतिक संग्रहालयातील करार व लोन पद्धतीने या वस्तू प्रदर्शनाकरिता पाठविण्यात येणार आहेत. प्रथमच कोल्हापुरातील ऐतिहासिक वस्तू प्रदर्शनासाठी परदेशात जात असल्याची माहिती कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक उदय सुर्वे यांनी दिली.

Kolhapur artefacts : दोन हजार वर्षांचा इतिहास

संग्रहालयात इ.स. २०० ते इ.स. पूर्व २०० या कालावधीतील समुद्र देवता, रोमन पदक, प्राचीन काळी कोल्हापूरचा जगभराशी असणाऱ्या व्यापार संबंधांची माहिती देणारा नकाशा (समुद्र मार्ग), प्राचीन हिंदू जैन धर्मातील देवतांच्या मूर्ती, विविध कालावधीतील शस्त्रास्त्रे, शिल्पाकृती, आदी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या अनेक वस्तूंचा समावेश आहे. सुमारे दोन हजार वर्षांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणारे संग्रहालय असे कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे महत्त्व  असल्याची माहिती सुर्वे यांनी दिली.

उत्खननात सापडलेल्या वस्तूंसाठी कोल्हापूर वस्तू संग्रहालयाची स्थापना

सन १९४५-४६ च्या दरम्यान कोल्हापूरातील पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या प्राचीन ब्रम्हपूरी टेकडी परिसरात कोल्हापूर संस्थानचा पुरातत्व विभाग व डेक्कन कॉलेज पुणे यांच्यावतीने उत्खनन करण्यात आले. उत्खननात सापडलेल्या वस्तूंसाठी ३० जानेवारी १९४६ मध्ये कोल्हापूर वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली. पुढे १९४९ मध्ये टाऊन हॉल उद्यानातील ‘कोल्हापूर नगर मंदीर’ येथे हे वस्तू संग्रहालय नेण्यात आले.

हेही वाचा : 

 

Back to top button