कराड विमानतळाच्या विस्ताराबाबत तीन महिन्यांत बैठक | पुढारी

कराड विमानतळाच्या विस्ताराबाबत तीन महिन्यांत बैठक

कराड, पुढारी वृत्तसेवा : कराड विमानतळ विस्ताराबाबत आगामी तीन महिन्यात उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सभागृहात दिली आहे. कराड विमानतळ विस्तारीकरणासाठी ग्रामस्थांचा विरोध नाही. त्यामुळे निधी मिळणे आवश्यक असून राज्य शासनाकडून त्वरित तोडगा काढण्याची मागणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. या प्रश्नास उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली आहे.

कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले तालुका पातळीवरील विमानतळ स्व. यशवंतराव चव्हाण यांनी उभारले होते. आपल्या मुख्यमंत्री काळात कराड विमानतळ विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर निधीअभावी प्रलंबित असणारा तो प्रश्न लवकर मार्गी लागावा, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये हेलिपॅड करण्यासाठी जागा निश्चितीचे आदेश दिलेले आहेत. हे जर खरे असेल तर शासनाने याबाबत काही धोरण ठरवलेले आहे का? असा राज्याच्या दृष्टीने महत्वाचा तसेच मतदारसंघातील कराड विमानतळाचा प्रश्न विधानसभेत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारले.

आ. चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या विमानतळाबाबत जो प्रश्न मांडलेला आहे, त्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय मिटिंग येत्या तीन महिन्यात घेतली जाईल. कराड विमानतळ विस्तारीकरणाबाबत जर शेतकर्‍यांच्या काही अडचणी नसतील, तर निधीची कोणतीही कमी होणार नाही. कराडचे विमानतळ हे अत्यंत महत्त्वाचं व स्ट्रेटेजिक विमानतळ आहे. त्यामुळे जर त्याचा विस्तार करता आला, तर त्याचा नक्कीच त्या भागातील लोकांना फायदा होऊ शकतो.

पाटण तालुक्यातील मागील पूर काळात विमानतळ आसपास नसल्याने त्यावेळी अशा परिस्थितीमध्ये विमानतळच आसपास नसल्याने कनेक्टिव्हिटी त्या भागात होत नव्हती. कोल्हापूर विमानतळावर उतरता येत नव्हतं, कारण तिथं पाण्याचा वेढा होता. त्यामुळे त्याचा सुद्धा विचार आपल्याला करणं गरजेच आहे. त्यामुळे एका नोडल एजन्सीच्या अंतर्गत आपणाला आणावे लागेल तशी एक नोडल एजेन्सी आपण तयार करू आणि पुढच्या तीन महिन्यात याचा एक प्लॅन आपण तयार करू, असेही उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.

Back to top button