Oppenheimer : ‘मी महाकाल आहे…’अणुबॉम्ब शोधणारे ओपनहायमर गीतेतील संदर्भ का द्यायचे? | पुढारी

Oppenheimer : 'मी महाकाल आहे...'अणुबॉम्ब शोधणारे ओपनहायमर गीतेतील संदर्भ का द्यायचे?

मोनिका क्षीरसागर

दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांचा ‘ओपेनहायमर’ (Oppenheimer) हा चित्रपट शुक्रवारी (२१ जुलै) प्रदर्शित झाला. जगभरात या चित्रपटाची चर्चा होत आहे. कारण आहे ते या चित्रपटाची कथा. ‘ओपेनहायमर’ (Oppenheimer) या चित्रपटातून दिग्दर्शक ख्रिस्तोफर हे अणुबॉम्बची निर्मिती करणारे शास्त्रज्ञ रॉबर्ट ओपेनहायमर यांची कहाणी घेऊन येत आहेत. अमेरिकेने जपानवर अणुबाॅम्‍ब टाकला. अवघ्‍या काही क्षणात सारं काही भस्‍मसात झालं. अणुबॉम्बची निर्मिती करणारे जूलियस रॉबर्ट ओपेनहायमर यांच्या अणुबॉम्ब निर्मिती प्रक्रियेत, तसेच आपल्या जीवनात वारंवार भगवत गीतेचा विशेष उल्लेख दिसून येतो. जाणून घेऊया अणुबॉम्बचा जनक जूलियस रॉबर्ट ओपेनहायमर (Oppenheimer) आणि भगवत गीतेचा काय आणि कसा आहे संबंध…

Oppenheimer: अणुबॉम्ब चाचणीनंतर ओपेनहायमरच्या तोंडी गीतेतील शब्द

ओपेनहायमरच्या संशोधनामुळे जगातील पहिला अणुबॉम्ब तयार झाला. त्याने जे काही निर्माण केले होते, त्याची भव्य शक्ती त्याने पूर्वीच ओळखली होती. १९४५ मध्ये न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात जेव्हा अणुबॉम्बची अमेरिकेने यशस्वी चाचणी झाल्यानंतर त्याच्या मनात आलेले पहिले शब्द हे गीतेतील होते; “दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता | यदि भा: सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मन: ||” म्हणजेच “आकाशात एकाच वेळी हजारो सूर्य उगवले तरी त्या सर्वांचा प्रकाश त्या विराट रूप परमात्म्याच्या दिव्य तेजस्वी रूपाची बरोबरी करू शकत नाही,” याची प्रचिती ओपेनहायमर (Oppenheimer) यांना आली.

जपानवर अणुबाॅम्‍बचा वापर; ओपेनहायमर यांना गीतेतील श्‍लाेकाचे स्‍मरण

अणुबॉम्बच्या यशस्वी चाचणीनंतर एका महिन्यातच अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात या अणुबॉम्बचा वापर केला. दुसऱ्या महायुद्धात जपानने युद्धातून माघार न घेतल्याने अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा ६ ऑगस्ट १९४५ रोजी तर नागासकी या शहरावर ९ ऑगस्ट १९४५ रोजी असे दोन अणुबॉम्ब टाकले. हा एक अतिशय भयावह हल्ला होता. अमेरिकेच्‍या या कृत्‍याची आजपर्यंतच्या इतिहासाच्या काळ्या पानांवर नोंद आहे. या महाभयंकर प्रलयाची तीव्रता आणि परिणाम आजही या शहरावर आणि येथील वातावरणात जाणवतात. या विनाशकारी संहाराने उद्विग्न झालेल्या ओपेनहायमरला एका मुलाखती दरम्यान पुन्हा गीतेची आठवण झाली. ‘जर हजारो सूर्य आकाशात फुटले तर, ते पराक्रमी देवाच्या तेजासारखे होईल.. ‘ असा भगवत गीतेतील ओळींचा उल्लेख त्‍यांनी केला हाेता.

ओपेनहायमर यांना कसा झाला गीतेतील श्‍लाेकांचा साक्षात्‍कार?

श्रीकृष्णानं अर्जुनाला विश्वरूपदर्शन दाखवलं होतं, तेव्हा म्हटलं होतं की, ‘मी महाकाल आहे, जो लोकांचा नाश करू शकतो. या लोकांच्या नाशासाठी मी आता प्रवृत्त झालो आहे. तू जरी युद्ध केले नाहीस तरी शत्रुपक्षीय सैन्यातील योद्ध्‌यांचा नाश होणार आहे.’ या महाभारताच्या कथेनुसार अर्जुन नैतिक पेचात सापडला होता, तेव्हा श्रीकृष्णाने त्याला दिलेलं ज्ञान गीतेत सामावलेला आहे. रॉबर्ट ओपेनहायमर अणुबॉम्ब निर्मितीच्या ‘प्रॉजेक्टवर काम करत होते, तिथे त्यांनाही काहीसा असाच नैतिक पेच पडला असावा, म्हणून त्यांना गीतेतील …कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः। ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः। ( म्हणजेच ‘मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे.’ ) या गीतेतील श्‍लाेकाचा साक्षात्कार झाला, असे  ‘इंडियन एक्सप्रेसने’ दिलेल्या लेखात म्हटले आहे.

बॉम्ब बनविण्यास विरोध; ओपेनहायमर यांना देशद्रोही ठरविण्‍याचा प्रयत्‍न

अणुबाॅम्‍ब वापरामुळे जपानमधील झालेल्‍या विध्‍वंसाने ओपेनहायमर यांना धक्‍का बसला. यानंतर अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांनी त्‍यांना हायड्रोजन बॉम्ब निर्मितीचे आवाहन केले. मात्र ओपेनहायमर यांनी याला तीव्र विराेध केला. यावेळी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्षांना ते भेटायला गेले. “माझ्‍या हाताला रक्‍त लागले आहे,” अशी खंत व्‍यक्‍त करत त्‍यांनी   हायड्रोजन बॉम्ब निर्मितीस विरोध केला. या विरोधामुळे अ‍ॅटॉमिक एनर्जी कमिशनच्या संचालक पदावरून त्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यांना देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्नही झाला; पण चौकशीनंतर ओपेनहायमर ह्यांना निर्दोष ठरविण्यात आले. शास्त्रीय संशोधनांचा अयोग्य वापर मानवी समाजाची फार मोठी हानी करू शकतो, ह्या जाणीवेतून आयुष्याच्या उत्तरार्धात ओपेनहायमर ह्यांनी ॲल्बर्ट आइन्स्टाइन, बर्ट्रंड रसेल आणि इतर नामवंतांसमवेत वर्ल्ड अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अ‍ॅन्ड सायन्सेस या संस्थेची स्थापना केली.

अशी लागली गीतेची गोडी

‘टाईम्स’ मॅक्झिनने दिलेल्या माहितीनुसार , ओपेनहायमर हे रोज सायंकाळी त्यांच्या मानसिक स्‍वास्‍थ आणि मित्रांचे प्रबाेधन करण्‍यासाठी गीता वाचत असत. ते संस्कृत भाषा शिकले आणि त्यांनी संस्कृत भाषेतून लिहिलेल्या भगवत गीतेचे वाचनही केले. त्यामुळे अणुबॉम्बच्या यशस्वी चाचणीचे वर्णन त्यांनी गीतेमधील एक श्लोक म्हणून केले होते. तर दुसऱ्यांदा अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत देखील ओपेनहायमर यांना गीतेमधील श्‍लाेकांचे स्‍मरण झाले हाेते.

विध्वंसकारी अणुबॉम्बसाठी ‘मॅनहॅटन’ प्रकल्पाची योजना

दुसऱ्या महायुद्धा दरम्यान अमेरिकेकडून ‘मॅनहॅटन’ प्रकल्पाची योजना आखण्यात आली. मॅनहटन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले. ह्या प्रकल्पातील त्यांचे योगदान मोलाचे ठरले. दुसऱ्या महायुध्दादरम्यान लॉस अ‍ॅलमॉस प्रयोगशाळेचे ते संचालक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांनी पहिल्या अणुबॉम्बची योजना तयार केली आणि 16 जुलै 1945 रोजी ॲलामोगोर्डो, न्यू मेक्सिको येथे त्याची यशस्वी चाचणीही घेतली, अशी माहिती मराठी विश्वकोशात देण्यात आली आहे.

अणुबॉम्बचा जनक ओपेनहायमर

अणुबॉम्बचा जनक जूलियस रॉबर्ट ओपेनहायमर याचे विश्वकिरण, सैद्धांतिक खगोलशात्र, केंद्रकीय भौतिकी, पुंज विद्युतगतिकी, पुंज क्षेत्रीय सिद्धांत, वर्णपंक्तिदर्शन इत्यादी शाखांमधे संशोधन होते. शिक्षक व संशोधक ह्या दुहेरी भुमिकेतून भौतिकशास्त्रात ओपेनहायमरने दिलेले योगदान, लॉस अ‍ॅलमॉस येथील प्रयोगशाळा आणि अणुबॉम्ब विकसनाच्या प्रकल्पाचे त्यांनी केलेले प्रभावी नेतृत्व ह्यासाठी अमेरिकन सरकारने ओपेनहायमर ह्यांना एन्‍रीको फेर्मी पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर आपल्या कारकीर्दीत ओपेनहायमर ह्यांना अनेक मान सन्मान मिळाले. त्यात मेडल ऑफ मेरिट, फ्रेंच सरकारचा लिजन ऑफ ऑनर हा लष्कराचा सर्वोच्च किताब, रॉयल सोसायटी, लंडनचे परदेशी सदस्य हे सन्मान आहेत. त्यांच्या सन्मानार्थ एका लघुग्रहाला ‘६७०८५-ओपेनहायमर’ हे नाव देण्यात आले आहे; तर चंद्रावरील एक विवरही ओपेनहायमर ह्यांच्या नावाने ओळखले जाते.

पाहा व्हिडिओ: ‘मी महाकाल आहे…’

हेही वाचा:

Back to top button