उत्तर रत्नागिरीला पावसाचा तडाखा | पुढारी

उत्तर रत्नागिरीला पावसाचा तडाखा

रत्नागिरी/चिपळूण/ खेड/राजापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा कहर सुरू आहे. गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने खेडमधील जगबुडी, चिपळुणातील वाशिष्ठी, राजापुरातील कोदवली आणि अर्जुना या प्रमुख नद्यांनी धोकापातळी गाठल्याने नद्यांच्या आसपासच्या गावांत पूरस्थिती उद्भवली होती. चिपळूण आणि खेड तालुक्यात पावसाचा जोर बुधवारी रात्री कमी झाल्याने गुरुवारी पूर ओसरला. चिपळुणात वाशिष्ठीचे पाणी वाढल्याने तेथे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकांकडून (एनडीआरएफ) मदतकार्य अहोरात्र सुरू आहे. तर प्रशासनाने संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन गुरुवारी शाळा बंद ठेवल्या होत्या.

चिपळूण, खेड तालुक्यात मागील 48 तासात सरासरी 327 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कमी वेळेत मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने वाशिष्ठी, शिव आणि जगबुडीला पूर आला. परिणामी खेड व चिपळूण शहर पाण्याने वेढले. याच पद्धतीने उत्तर रत्नागिरीतील दापोली, मंडणगड, गुहागरसह चिपळूण, खेड या तालुक्यात 48 तासात अतिवृष्टी झाली आणि या पाच तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागाला फटका बसला. खेड तालुक्यातील जगबुडी व नारिंगी नदीला आलेला पूर ओसरला आहे. येथील जगबुडी नदी अद्याप धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.

चिपळूणमध्ये दि. 19 व 20 रोजी 164 मि. मी. पाऊस झाला आहे. म्हणजेच 48 तासात 314 मि. मी. असा पाऊस झाला आहे. याच कालावधीत सह्याद्री घाटमाथा असलेल्या नवजामध्ये 19 रोजी 307 तर 20 रोजी 272 म्हणजेच 48 तासात तब्बल 579 मि. मी. असा पाऊस झाला आहे. सह्याद्री पर्वताला जल दुभाजक असेही म्हटले जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर कोसळणारा पाऊस पूर्व आणि पश्चिम विभागात दुभागला जातो आणि पश्चिमेकडील पाऊस हा वाशिष्ठी, सावित्री, जगबुडी नदीला येऊन मिळतो. परिणामी, महाड, चिपळूण, खेड या शहरांना पुराचा तडाखा बसतो.

नवजा येथे मोठ्या प्रमाणावर पडलेल्या पावसाचा परिणाम चिपळुणात पूर येण्यावर झाला आहे. मात्र गाळ काढल्याने पूरस्थिती निर्माण?झाली नाही. उत्तर रत्नागिरीतील सर्वच तालुक्यांना पावसाने तडाखा दिला. मंडणगडमध्ये गेल्या 48 तासांत 287, दापोली 296, खेड 341, चिपळूण 314 त्या खालोखाल गुहागरमध्ये पाऊस झाला आहे. मात्र, याच कालावधीत दक्षिण रत्नागिरीत मात्र या प्रमाणात पाऊस झालेला नाही.

Back to top button