‘खरोखरच व्‍यथित करणारे,सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही करू’ : मणिपूरमधील ‘विवस्‍त्र’ धिंडप्रकरणी सुप्रीम कोर्टची स्‍पष्‍टाेक्‍ती | पुढारी

'खरोखरच व्‍यथित करणारे,सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही करू' : मणिपूरमधील 'विवस्‍त्र' धिंडप्रकरणी सुप्रीम कोर्टची स्‍पष्‍टाेक्‍ती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील दोन महिन्‍यांपासून अधिक काळ हिंसाचारात होरपळणार्‍या मणिपूर राज्‍यात संतापजनक आणि मानवतेला अत्‍यंत लाजिरवाणी करणारी घटना समोर आली आहे. राज्‍यात एक व्‍हिडिओ व्‍हायरल झाला असून त्‍यामुळे दोन महिलांची विवस्‍त्र धिंड काढल्‍याचे दिसते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. दरम्‍यान, या घटनेची गंभीर दखल सर्वोच्‍च न्‍यायालयानेही घेतली आहे. या प्रकरणाची सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्वतःहून याची दखल घेतली (स्यु मोटो) आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने कारवाई करावी, असे निर्देशही दिले आहेत.

खरोखरच व्‍यथित करणारे…

मणिपूरमध्‍ये दोन महिलांची ‘विवस्‍त्र’ धिंड काढण्‍याच व्हिडिओ काल समोर आला होता. हा प्रकार खरोखरच व्‍यथित करणार आहे, अशी टिप्‍पणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने केली आहे. न्यायालय व्हिडिओमुळे खूप व्यथित झाले आहे आणि सरकारने तसे न केल्यास ते कारवाई करेल, असे सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही करू

हे सारं काही अस्वीकार्य आहे. जातीय संघर्षामध्‍ये महिलांचा एक साधन म्हणून वापर करणे हा सर्वात मोठा दुरुपयोग आहे. आम्ही समोर आलेल्या व्हिडिओंमुळे खूप व्यथित झालो आहोत. जर सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही करू, असे सरन्‍यायाधीशांनी स्‍पष्‍ट केले. या प्रकरणी मणिपूर सरकारने अहवाल सादर करण्‍याचे आदेशही न्‍यायालयाने दिले आहेत.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मणिपूरमधील महिलांची नग्‍न धिंड काढणारा व्हिडिओ व्‍हायरल झाल्‍याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाकडून कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे. दोन महिलांवर शेतात सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप एका आदिवासी संघटनेने केला आहे.

या प्रकरणी पोलिस अधीक्षक के मेघचंद्र सिंह यांनी सांगितले की, “व्‍हायरल होत असलेला व्हिडिओ ४ मे रोजीचा आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून या संदर्भात अज्ञात चोरट्यांविरुद्ध अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खून इत्यादींचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.”

मुख्‍य आरोपीला अटक

या प्रकरणातील एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. खुयरुम हेरदास असे आरोपीचे नाव आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तो हिरवा शर्ट घातलेला दिसत आहे. व्हिडिओवरून त्याची ओळख पटली आहे.पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत कांगपोकपी जिल्ह्यातील घटनेची तारीख 4 मे असल्याचे नमूद केले आहे. तथापि, 21 जून रोजी थौबल जिल्ह्यात एफआयआर दाखल करण्यात आला. अज्ञात लोकांविरुद्ध अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्‍हिडिओ शेअर न करण्‍याचे आदेश

या घटनेची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. हा व्‍हिडिओ ट्विटर आणि इतर सोशल मीडिया शेअर करू नका, असे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही स्‍पष्‍ट केले आहे. दरम्‍यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी या घटनेवर टीका करत हा मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे म्हटले आहे.

निंदनीय आणि पूर्णत: अमानवीय : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरवर या घटनेला “निंदनीय आणि पूर्णपणे अमानवीय” म्हटले आहे. स्मृती इराणी यांनी असेही सांगितले की त्यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंग यांना डायल केले ज्यांनी त्यांना आश्वासन दिले की, “दोषींना न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही”.

Back to top button