विरोधी आघाडीच्‍या ‘इंडिया’ नावाला होता नितीश कुमारांचा आक्षेप!, जाणून घ्‍या कारण | पुढारी

विरोधी आघाडीच्‍या 'इंडिया' नावाला होता नितीश कुमारांचा आक्षेप!, जाणून घ्‍या कारण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विरोधी पक्षांची मंगळवार,१८ जुलै रोजी बंगळुरमध्‍ये बैठक झाली. पूर्वी विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव ‘युपीए’ (UPA-United Progressive Alliance) म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी असे होते. आता या आघाडीचे नाव इंडिया (INDIA- Indian National Developmental Inclusive Alliance) म्हणजे भारतीय राष्ट्रीय विकास सर्वसमावेशक आघाडी असे करण्यात आल्याचे बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आले. मात्र विरोधी आघाडीसाठी विरोधी पक्षांना एकत्रीत आणण्‍यासाठी सुरुवातीपासून प्रयत्‍न करणारे नितीश कुमार ( Nitish kumar ) यांचा इंडिया या नावाला आक्षेप होता, अशी माहिती आता समोर येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे विरोधी आघाडीला ‘इंडिया’ नाव दिल्याने नाराज आहेत. आघाडीचे नाव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बेंगळुरू येथे झालेल्या दुसऱ्या विरोधी बैठकीत सुचवले होते, ज्यात २६ विरोधी पक्ष सहभागी होते. इंडिया नाव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठकीत सुचवले होते. हे नाव निश्चित करताना बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

अनौपचारिक बैठक ठरले हाेते नाव

साेमवारी झालेल्या अनौपचारिक बैठकीत विराेधी पक्षांची  ‘इंडिया’ नावावर चर्चा झाली. चर्चेनंतर अखेर सर्वच पक्षांनी मंगळवारी विरोधी एकजुटीच्या आघाडीच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मात्र अशीही चर्चा  आहे की, विराेधी आघाडीचे नाव INDIA ठेवण्याचा निर्णय घेतला जात होता, तेव्हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले होते.

नितीशकुमारांचा INDIA नावाला का आक्षेप ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराेधी आघाडीचे नवे नाव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगळूर येथे झालेल्या बैठकीत सुचवले होते.  ज्यात २६ विरोधी पक्ष सहभागी होते. नितीश कुमार यांनी INDIA या नावावर आक्षेप घेतला कारण त्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) या नावातील शब्दांचा समावेश होतो.

राहुल गांधींकडून ‘इंडिया’ नाव ठेवण्याचा युक्तीवाद

ममता बॅनर्जी यांनी आघाडीचे नवे नाव सूचवले, असे विदुथलाई चिरुथाईगल काचीचे प्रमुख थोल थिरुमावलावन यांनी सांगितले. प्रदीर्घ चर्चेनंतर INDIA म्हणजेच भारतीय राष्ट्रीय विकास सर्वसमावेशक आघाडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे म्हणाल्या की, राहुल गांधींनी भारताच्या नामकरणावर युक्तीवाद केला. विराेधी पक्षांच्‍या आघाडीचे  नाव INDIA का ठेवावे, हे त्यांनी स्पष्ट केले. नंतर सर्व पक्षांनी त्यास मान्यता दिली हाेता.

नितीश कुमारांच्‍या आक्षेपावर लालन सिंह यांचा खुलासा

बंगळूर येथील विरोधकांच्‍या बैठकीवेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार संतप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. जनता दल युनायटेड (जेडीयू) चे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंग उर्फ ​​लालन सिंग यांनी माध्‍यमांशी बाेलताना यावर खुलासा केला. ते म्‍हणाले की, ही सर्व अफवा आहे. नितीश कुमार हे विरोधी ऐक्याचे शिल्पकार आहेत. सूत्रधाराला कधीच राग येत नाही. त्‍यामुळे नितीश कुमार नाराज असल्‍याची माहिती  पूर्णपणे चुकीची आहे. मुंबईत होणाऱ्या पुढील बैठकीत विराेधी पक्षांची  पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. सर्वांच्या संमतीने विरोधी पक्षांच्‍या आघाडीचे  नाव INDIA  ठेवण्यात आले आहे. त्यावर कोणाचाही आक्षेप नाही.”

हेही वाचा :

 

Back to top button