

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप विरोधी पक्षांची बैठक मंगळवारी (दि.१८) बंगळूर येथे पार पडली. यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आपली भूमिकाही जाहीर केली. तसेच आघाडीचे नाव 'इंडिया' केल्याचीही घोषणा केली. त्यामुळे भाजप नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) समोर मोठे आव्हान असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल, यावर अद्याप स्पष्टता नाही. मात्र याबाबत तृणमूल काँग्रेसच्या खासदार शताब्दी रॉय यांनी सूचक विधान करत आपल्या पक्षाची महत्त्वाकांक्षा अप्रत्यक्षपणे सांगितली आहे. ( TMC Mamata Banerjee )
पश्चिम बंगालमधील वीरभूमी येथे तृणमूलच्या खासदार शताब्दी रॉय यांनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेस पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी शताब्दी रॉय म्हणाल्या, "काँग्रेसला पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये नसेल तर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी पंतप्रधान व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे."
विरोधी पक्षांची१८ जुलै रोजी बंगळुरमध्ये बैठक झाली. पूर्वी विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव 'युपीए' (UPA-United Progressive Alliance) म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी असे होते, ते आता इंडिया (INDIA- Indian National Developmental Inclusive Alliance) म्हणजे भारतीय राष्ट्रीय विकास सर्वसमावेशक आघाडी असे करण्यात आल्याचे बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आले. या बैठकीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यासंदर्भातील माहिती बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत (Opposition Meet Bangalore) दिली. त्यामुळे आता आगामी लोकसभा २०२४ मध्ये देखील देशात सत्ताधारी पक्षाची राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) विरूद्ध भारतीय राष्ट्रीय विकास सर्वसमावेशक आघाडी(INDIA) अशी लढत होणार आहे.
हेही वाचा :