पुणे : स्कूल बस नियमावलीचे पालन करा ; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे निर्देश | पुढारी

पुणे : स्कूल बस नियमावलीचे पालन करा ; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे निर्देश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून, विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणार्‍या स्कूल बस यांनी नियमावलीचे काटेकोर पालन करा, अशा सूचना पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.
पोलिस आयुक्त रितेश कुमार विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीच्या बैठकीत बोलत होते. या वेळी पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. मितेश घट्टे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर आदी उपस्थित होते. पोलिस आयुक्त कुमार म्हणाले, विद्यार्थ्यांची घर ते शाळेदरम्यानच्या वाहतुकीत अपघात किंवा इतर प्रकारे जीवितास, शारीरिक, मानसिक धोक्याच्या घटनांना प्रतिबंध व्हावा, यासाठी स्कूल बस नियमावलींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.  स्कूल बसमध्ये मदतनीस (अटेंडन्ट), मुलींची वाहतूक होणार्‍या स्कूल बसमध्ये  महिला मदतनीस असणे बंधनकारक आहे.
वाहनांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम
पुणे शहरात माहिती तंत्रज्ञान कंपन्या व आदी ठिकाणी रात्रपाळीत काम करणार्‍या महिला तसेच एकूणच रात्री प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक व सर्वच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ऑटो रिक्षा, टॅक्सी आदींच्या तपासणीसाठी पोलिस विभाग, वाहतूक शाखा तसेच परिवहन विभागाने संयुक्त विशेष मोहीम हाती घ्यावी, अशा सूचनाही रितेश कुमार यांनी दिल्या.
फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई करा
रात्रीच्या वेळी अडवून अव्वाच्या सव्वा प्रवासभाडे मागणे, चोर्‍या, प्रवाशांना मारहाण तसेच अन्य गैरप्रकार घडल्याचे लक्षात घेऊन रात्री नाकाबंदीच्यावेळी सर्व वाहनांची कसून तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांच्या नंबर प्लेट जप्त करणे व वाहने अटकावून ठेवा, असेही निर्देश पोलिस आयुक्तांनी दिले.
30 लाखांचा दंड वसूल
जिल्ह्यात 9 हजार 663 हजार स्कूल बस असून, 5 हजार 731 शाळांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने जानेवारी ते 10 जुलै 2023 दरम्यान 709 स्कूल बस तसेच 417 इतर वाहनांची तपासणी केली. यामध्ये 178 स्कूल बस व 84 इतर वाहने दोषी आढळली व 35 वाहने अडकवून ठेवण्यात आली. या कारवाईत नियमांच्या उल्लंघनाबद्दल 29 लाख 75 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा :

Back to top button