पुणे : अतिक्रमण, खड्ड्यांवरून आयुक्त आक्रमक | पुढारी

पुणे : अतिक्रमण, खड्ड्यांवरून आयुक्त आक्रमक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाढती अतिक्रमणे, फ्लेक्स, होर्डिंग्ज आणि खड्डयांवरून महापालिका आयुक्त विक्रम कुमार मंगळवारी आक्रमक झाले. आठवडाभरात यावर कारवाई न केल्यास संबंधित अधिकार्‍यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशाराही आयुक्तांनी या वेळी दिली. महापालिका आयुक्तांनी अतिक्रमण, बांधकाम, पथ, आकाशचिन्ह, घनकचरा व्यवस्थापन आदी विभागांच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार व विकास ढाकणे, विविध विभागप्रमुख, परिमंडळ उपायुक्त, क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त, अतिक्रमण विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली असतानाही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसांत अधिकृत परवानाधारक विक्रेते वगळता अन्य अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करावी, अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्सविरोधातही कडक कारवाई, आठवड्यानंतर अतिक्रमण, अनधिकृत विक्रेते आढळल्यास संबंधित निरीक्षकांवर कारवाई केली जाईल, अशी इशारा आयुक्तांनी दिल्याचे डॉ. खेमनार यांनी दिली.

पथ विभागाचीही झाडाझडती
आयुक्तांनी या वेळी पथविभागाचीही झाडाझडती घेतली. रस्त्यावरील खड्डे 31 मेपर्यंतच बुजवले जाणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे कोल्ड मिक्ससह उपलब्ध साधनांचा वापर करून चार दिवसांत खड्डे बुजवण्याचे आदेश आयुक्तांनी या बैठकीत दिले. तसेच समान पाणीपुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापन विभागाची कामे या व्यतिरिक्त फक्त विशेष परवानगी दिलेल्या अत्यावश्यक कामासाठीच खोदकाम केले जाईल, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही या वेळी केल्या.

अहवालाचा ताळमेळ नाही
शहरातील होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरल ऑडिटची माहिती मागवण्यात आली होती. परंतु, तीन महिन्यांनंतरही ही माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनीही परिमंडळ उपायुक्तांना नोटीस दिल्या होत्या. या बैठकीत अनेक उपायुक्तांनी अहवाल सादर केल्याचा दावा काही केला. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळ उपायुक्त व आकाशचिन्ह विभागात ताळमेळ नसल्याचेही समोर आले. त्यामुळे पुढील तीन दिवसांत पुन्हा बैठक घेण्यात येईल, त्यात अहवाल सादर करा, अशा सूचना डॉ. खेमनार यांनी परिमंडळ उपायुक्तांना दिली.

हे ही वाचा :

पुणे भाजपाच्या शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची नियुक्ती

जळगाव : गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतली तीन लाखांची लाच, पोलीस निरीक्षकासह तिघांना रंगेहात अटक

Back to top button