WI vs BAN : अखेर माजी विजेत्यांना विजयी सूर गवसला | पुढारी

WI vs BAN : अखेर माजी विजेत्यांना विजयी सूर गवसला

शारजाह : पुढारी ऑनलाईन

 WI vs BAN :  बांगलादेशने अखेरच्या चेंडूवपर्यंत झुंज दिल्याने वेस्ट इंडीजचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टातच आणले होते. मात्र अखेरच्या चेंडूवर बांगलादेशला विजयासाठी ४ धावांची गरज असताना महमद्दुल्लाला एकही धाव घेता आली नाही. विंडीजने प्रथम फलंदाजी करत १४३ धावांचे आव्हान ठेवले होते. लिटन दास ( ४४ ) आणि कर्णधार महमद्दुल्लाने ( ३१ ) झुंजार खेळी करत सामना अखेरच्या षटापर्यंत नेला. मात्र अखेरचे षटक टाकणाऱ्या आंद्रे रसेलने दमदार गोलंदाजी करत बांगलादेशला १३९ धावातच रोखले.

वेस्ट इंडीजने ठेवलेल्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शाकिब – अल – हसन ९ धावांवर बाद झाला. त्यानतंर दुसरा सलामीवीर मोहम्मद नईम १७ धावा करुन होल्डरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे बांगलादेशची अवस्था ५ षटकात २ बाद २९ धावा अशी झाली.

त्यानंतर लिटन दास आणि सौम्या सरकारने बांगलादेशचा डाव सावरत १० षटकात बांगलादेशला ६० धावांपर्यंत पोहचवले. मात्र अकिल हुसैननने सौम्या सरकारला १७ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. यानंतर आलेला मुशफिकूर रेहमान देखील ८ धावांचीच भर घालून माघारी परतला. त्याचा रवी रामपॉलने त्रिफळा उडवून दिला.

ठराविक अंतराने विकेट पडत असल्याने बांगलादेशची धावगती थोडी मंदावली होती.  दरम्यान, सेट झालेल्या लिटन दास आणि महमद्दुल्लाने १६ व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. पाचव्या विकेटसाठी या दोघांनी ४० धावांची भागीदारी करत सामना जवळ आणला. मात्र मोक्याच्या क्षणी ब्रोव्होने लिटन दासला ४४ धावांवर बाद केले. त्यानंतर महमद्दुल्लाने डावाची सूत्रे हातात घेतली. त्याने सामना शेवटच्या चेंडूवपर्यंत नेला. मात्र अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना त्याला एकही धाव घेता आली नाही.

शेवटचे षटक टाकणाऱ्या आंद्रे रसेलने अखेरच्या षटकात १३ धावांची गरज असताना फक्त ९ धावा दिल्या. विंडीजकडून सर्वच गोलंदाजांनी एक – एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, टी २० वर्ल्डकपमधील आजच्या बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडीज ( WI vs BAN ) सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगालादेशी गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच प्रभावी मारा करत विंडीजच्या सलामीवीरांना जखडून ठेवले. अखेर मुस्तफिजूरने एव्हिन लुईसला ६ धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर मेहंदी हसनने ख्रिस गेलला ४ धावांवर बाद करत विंडीजला दुसरा आणि मोठा धक्का दिला.

या धक्कादायक सुरुवातीनंतर विंडीजला सावरण्यासाठी शिमरोन हेटमायर आणि रोस्टन चेस खेळपट्टीवर आले होते. मात्र मेहंदी हसनने हेटमायरची ९ धावांवर शिकार करत विंडीजला तिसरा धक्का दिला. त्यानंतर चेस आणि कर्णधार कायरन पोलार्ड यांनी संघाचे अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी विंडीजला १२ षटकात ६० धावांवर पोहचवले. मात्र पोलार्ड मोक्याच्या क्षणी रिटायर हर्ट झाला.

WI vs BAN : निकोलस पूरनची धमाकेदार फलंदाजी

त्यानंतर पुढच्याच चेंडूवर आंद्रे रसेल धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये पोहचला. त्यामुळे विंडीजची अवस्था १३ षटकात ४ बाद ६२ अशी बिकट झाली. एका बाजूने चांगली फलंदाजी करत असलेल्या रोस्टन चेसच्या साथीला आता निकोलस पूरन आला होता. या दोघांनी धावांची गती वाढवत संघाला १७ व्या षटकात शतक पार करुन दिले. निकोलस पूरनने आल्यापासून आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली.

निकोलस पूरनने चार षटकार आणि एक चौकार ठोकत २२ चेंडूत ४० धावा कुटल्या. त्याच्या या फटकेबाजीमुळे विंडीज सन्मानजनक धावसंख्येच्या जवळ पोहचला. पण, १९ व्या षटकात शोरीफुल इस्लामने पहिल्यांदा पूरनला ४० धावांवर नंतर पुढच्याच चेंडूवर रोस्टन चेसला ३९ धावांवर बाद करत विंडीजचे हे प्रतिआक्रमण मोडून काढले. त्यानंतर आलेला ब्रोव्होही १ धावेची भर घालून माघारी गेला.

दरम्यान, अखेरच्या षटकात कायनर पोलार्ड जेसन होल्डरला साथ देण्यासाठी पुन्हा मैदानावर आला. होल्डरने दोन षटकार ठोकत विंडीजला १३५ च्या पार पोहचवले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर पोलार्डने षटकार ठोकत १४२ धावांचा टप्पा गाठला. विंडीजने खराब सुरुवातीनंतर २० षटकात ७ बाद १४२ धावा केल्या.

Back to top button