पुणे : वानवडीत गॅसवाहिनीला आग ; साळुंके विहार रस्त्यावरील घटना | पुढारी

पुणे : वानवडीत गॅसवाहिनीला आग ; साळुंके विहार रस्त्यावरील घटना

पुणे / वानवडी : पुढारी वृत्तसेवा :  साळुंखे विहार रस्त्यावरील ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’च्या (एमएनजीएल) वाहिनीतून गॅसगळती होऊन शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. पाच बंबाच्या साह्याने अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत एका मोटारीचे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. आगीमुळे परिसरातील गॅसपुरवठा काही काळ बंद ठेवण्यात आला होता.

साळुंखे विहार रस्ता परिसरात एमएनजीएल कंपनीकडून गॅसपुरवठा करण्यात येतो. या भागात गॅसपुरवठा करणार्‍या वाहिनीतून गॅसगळती सुरू झाली. गॅसगळतीमुळे स्फोट होऊन या वाहिनीने पेट घेतला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. कोंढवा अग्निशमन दल केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेत सुमारे दोन तासांनंतर ही आग आटोक्यात आणली. या घटनेची माहिती एमएनजीएलच्या अधिकार्‍यांना कळविण्यात आली. एमएनजीएलच्या तंत्रज्ञानी घटनास्थळी भेट देऊन गॅसपुरवठा बंद केल्याची माहिती अग्निशमन दलाच्या आधिकार्‍यांनी दिली.

स्फोट झाला नसल्याचा दावा
कचरा जाळल्यामुळे गॅसवाहिनी फुटल्याने ही आग लागली. यात कोणताही स्फोट झाला नाही. गॅसवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. ते पूर्ण झाल्यानंतर परिसरातील गॅसपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे एमएनजीएल कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

30 ते 35 फुटांवर आगीच्या ज्वाळा
गॅस वाहिनीचा स्फोट झाला त्या वेळी वाहने मुख्य रस्त्यावर आली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. गॅस वाहिनीतून अचानक स्फोट झाला आणि 30 ते 35 फूट उंच आगीच्या ज्वाळा उसळल्या. यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच या रस्त्यावर दुतर्फा वाहतूक कोंडी झाल्याचे चित्रही दिसून आले.

हेही वाचा :

पुणेकरांनो महत्त्वाची बातमी ! चांदणी चौकातील पूल ऑगस्टमध्ये होणार खुला

पिचाई, नडेलापेक्षाही श्रीमंत भारतीय महिला

Back to top button