पिचाई, नडेलापेक्षाही श्रीमंत भारतीय महिला | पुढारी

पिचाई, नडेलापेक्षाही श्रीमंत भारतीय महिला

वॉशिंग्टन : गुगलचे भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्याबद्दल तुमच्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. या दोघांचा प्रवास खरोखरच प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारा आहे. मात्र, आज आपण अशा एका भारतीय वंशाच्या महिलेबद्दल बोलणार आहोत ज्या श्रीमंतीच्या बाबतीत या अब्जाधीशांपेक्षाही सरस आहेत. या ठिकाणी आपण ज्यांच्याबद्दल बोलत आहोत त्यांचं नाव आहे जयश्री वी. उल्लाल! जयश्री या अरिस्टा नेटवर्क्स या कंपनीच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अध्यक्षा आहेत. ‘फोर्ब्स’च्या यादीनुसार उल्लाल यांची एकूण संपत्ती 250 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 19 हजार 752 कोटी रुपये इतकी आहे. अमेरिकेतील सर्वात श्रीमंत ‘सेल्फ मेड’ म्हणजेच स्वबळावर श्रीमंत झालेल्या महिलांच्या यादीत जयश्री यांचा समावेश आहे.

भारतीय वंशांच्या अमेरिकन नागरिक असलेल्या जयश्री उल्लाल, इंद्रा नूई, नीरजा सेठी आणि नेहा नरखेडे यांचा ‘फोर्ब्स’ने अमेरिकेतील टॉप 100 सेल्फ मेड श्रीमंत म्हणजेच स्वत:च्या जोरावर श्रीमंत झालेल्या व्यक्तींच्या यादीत समावेश केला आहे. या चारही महिला अब्जाधीश आहेत. या महिला अमेरिकेतील 100 सर्वात यशस्वी उद्योजक, प्रशासकीय कारभार आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रभावशाली श्रीमंत व्यक्तींपैकी आहेत.

अल्फाबेट इंक आणि गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या पिचाई यांची एकूण संपत्ती 1.31 बिलियन डॉलर्स म्हणजेच 131 कोटी अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. तर मायक्रोसॉफ्टच्या सत्या नडेला यांची एकूण संपत्ती 420 मिलियन इतकी आहे. म्हणजेच पिचाई आणि नडेला यांची एकूण संपत्ती ही 1.7 बिलियन डॉलर्स इतकी आहे. या दोघांची संपत्ती एकत्र केली तर जयश्री यांची संपत्ती (2.5 बिलियन डॉलर्स) अधिक आहे. जयश्री वी. उल्लाल कॉम्प्युटर नेटवर्किंग कंपनी असलेल्या अरिस्टा नेटवर्क्सच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यकरत आहेत. जयश्री या 2008 पासून म्हणजेच मागील 15 वर्षांपासून या कंपनीचे नेतृत्व करत आहेत.

जून 2014 मध्ये जयश्री यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीने आपला ‘आयपीओ’ बाजारात आणला. या माध्यमातून कंपनीला अब्जावधी डॉलर्सपर्यंत आपला उद्योग वाढवता आला. याचे संपूर्ण श्रेय जयश्री यांनाच दिले जाते. कंपनी कोणत्याही प्रकारचा नफा कमवत नव्हती आणि त्यांच्याकडे केवळ 50 कर्मचारी होते तेव्हापासून जयश्री या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच कंपनी मजल दरमजल करत आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. उलाल या कंपनीच्या संस्थापक नसून कर्मचारी आहेत तरीही त्यांनी स्वत:च्या कष्टाच्या जोरावर एवढी संपत्ती कमवली आहे. जयश्री यांचा जन्म अमेरिकेत झाला. मात्र, त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण नवी दिल्लीमध्ये पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी त्या सॅनफ्रॅन्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये गेले. तिथे त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.

Back to top button