तीन हजार वर्षांपूर्वीची सोन्याची कडी, कंगव्याचा शोध | पुढारी

तीन हजार वर्षांपूर्वीची सोन्याची कडी, कंगव्याचा शोध

लंडन : दागिन्यांमध्येही अनेक प्रकार पाहायला मिळत असतात. आपल्याकडेही प्राचीन काळापासून डोक्यापासून पायापर्यंतचे अनेक प्रकारचे दागिने प्रचलित आहेत. त्यामध्ये केसांमधील चुडामणीसारख्या दागिन्याचाही समावेश होतो. आता ब्रिटनमध्ये तीन हजार वर्षांपूर्वीच्या अशाच केसांमध्ये वापरल्या जाणार्‍या सोन्याच्या दागिन्याचा शोध लागला आहे. वेल्समध्ये पुरातत्त्व संशोधकांनी कांस्ययुगातील दफनभूमीतील उत्खननात हा दागिना तसेच ब्रि टनमधील सर्वात जुना ठरलेला लाकडी कंगवाही शोधला आहे.

एका थडग्यात या वस्तू आढळून आल्या. हे थडगे तीन हजार वर्षांपूर्वीच्या एका व्यक्तीचे असून त्याच्या देहाचे अवशेषही याठिकाणी सापडले आहेत. त्याच्या देहाबरोबर अशा सुंदर व अत्यंत दुर्मीळ वस्तूही ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे लाकडाचा कंगवाही इतक्या वर्षांनंतर एखाद्या कोळशासारखा टिकून राहिलेला दिसून आला. इंग्लंडमधील आर्कियोलॉजिकल फर्म असलेल्या रेड रिव्हर आर्कियोलॉजीचे संचालक डेव्ह गिलबर्ट यांनी सांगितले की या ठिकाणी सापडलेली सर्वात आकर्षक वस्तू म्हणजे ही सोन्याची कडी.

लाकडी कंगवाही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा आहे. त्याला छोटे आठ दात आहेत. सहसा लाकडाच्या किंवा अन्य जैविक पदार्थांच्या वस्तू काळाच्या ओघात मातीत विघटित होऊन जात असतात. या थडग्यातील माणसाचे दहन करण्यात आले होते. त्याच्याबरोबरच या वस्तूही ठेवल्या असल्याने त्यांना आगीची झळ बसलेली असावी. त्याचा परिणाम म्हणून हा कंगवा कोळशासारखा बनून टिकून राहिला असावा, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button