IND vs WI 1st Test : आर. अश्‍विन @700+, डॉमिनिका कसोटीच्‍या पहिल्‍या दिवशी ठरला ‘विक्रमवीर’ | पुढारी

IND vs WI 1st Test : आर. अश्‍विन @700+, डॉमिनिका कसोटीच्‍या पहिल्‍या दिवशी ठरला 'विक्रमवीर'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि वेस्ट इंडिज ( IND vs WI 1st Test ) यांच्यात डॉमिनिका येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिला दिवस भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन ( R Ashwin ) याने गाजवला. या सामन्‍यातील पहिल्‍या दिवशी अनेक नवे विक्रम त्‍याच्‍या नावावर नोंदले गेले आहे.

अश्विनने ७०२ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेत डेल स्टेनला टाकले मागे

आर. अश्विनने वेस्‍ट इंडिजविरुद्धच्‍या पहिल्‍या कसोटीतील पहिल्‍या दिवशी ५ बळी घेतले. या कामगिरीमुळे त्याच्या नावावर ७०२ आंतरराष्ट्रीय विकेट्स झाल्‍या आहेत. क्रिकेटच्‍या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विनने १६व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन (६९९ बळी) याला मागे टाकले आहे. ७०० हून अधिक बळी घेणारा तोतिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. भारताच्‍या अनिल कुंबळे याच्‍या नावावर ९५६ तर हरभजन सिंग याच्‍या नावावर ७११ विकेट आहेत.

IND vs WI 1st Test : ३३ वेळा एका डावात ५ विकेट

डॉमिनिका कसोटीत आर. अश्‍विन याने वेस्‍ट इंडिजचा निम्‍मा संघ तंबूत धाडला. त्याने एका डावात ५ विकेट ३३ वेळा घेण्‍याचा विक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५ बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अश्विन सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्‍याच्‍या नावावर ९३ कसोटीच्‍या ३३ डावात ५ किंवा त्‍यापेक्षा अधिक विकेट घे‍‍ण्याचा विक्रम नाेंदला गेला आहे. या कामगिरीमुळे त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याला मागे टाकले आहे. एका डावात सर्वाधिकवेळा ५ व त्‍यापेक्षा अधिक बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने हा पराक्रम तब्‍बल ६७ वेळा केला आहे.

पिता-पुत्राची विकेट घेणारा अश्विन ठरला पहिला भारतीय गोलंदाज

आर अश्विन कसोटीत पिता-पुत्राची विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा सलामीवीर तेजनारिन चंद्रपॉल याला बाद केले. अश्विनने २०११ मध्ये तेजनारायणचे वडील शिवनारायण चंद्रपॉल यांचीही विकेट घेतली होती. २०११ मध्ये त्याने नवी दिल्लीत झालेल्या कसोटीत शिवनारायणला एलबीडब्ल्यू केले होते. यानंतर त्‍याचा मुलगा तेजनारिन चंद्रपॉल याला बाद करत दोन पिढ्यांमधील फलंदाजांना  बाद केल्‍याचा विक्रम त्‍याच्‍या नावावर नाेंदला गेला आहे.

IND vs WI 1st Test : बिशनसिंग बेदी यांचा विक्रम मोडला

अश्विनने कसाेटी क्रिकेटमध्‍ये वेस्ट इंडिजच्या ६५ फलंदाजांचे बळी घेतले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा अश्विन हा चौथा भारतीय गाेलंदाज ठरला आहे. त्याने बिशनसिंग बेदी यांचा विक्रम मोडला आहे. तसेच भागवत चंद्रशेखर यांच्‍या विक्रमाची बरोबरी केली आहे. अश्विनने कॅरेबियन संघाविरुद्ध १२ कसोटी सामन्यांमध्‍ये ६५ बळी घेतले आहेत, तर बेदी यांच्‍या नावावर १८ सामन्यांमध्‍ये ६२ बळी आहेत. चंद्रशेखर यांनी ६५ कॅरेबियन विकेट्सही घेतल्या हाेत्‍या.

हेही वाचा :

 

Back to top button