हिंगोली : गोरेगावमध्ये रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी | Boar Attack | पुढारी

हिंगोली : गोरेगावमध्ये रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी | Boar Attack

गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव शिवारामध्ये शेतात जनावरांना चारापाणी करण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर रानडुकरांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि. ८) सकाळी नऊ वाजता घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकर्‍याला तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

गोरेगाव येथील रमेश गंगाराम गवळी (वय ४८) यांचे गोरेगाव शिवारामध्ये शेत आहे. शेतामध्ये त्यांनी जनावरांसाठी गोठा केलेला आहे. दररोज सकाळी शेतात येऊन ते जनावरांना चारापाणी करतात तसेच रात्री घरी जाताना चारापाणी करून जातात. दरम्यान शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रमेश गवळी हे शेतात जनावरांना चारा पाणी करण्यासाठी आले होते. यावेळी गोठ्यामध्ये चारा टाकत असताना समोर असलेल्या गवतामधून अचानक रानडुकरांचा कळप त्यांच्या अंगावर आला. त्यांच्या उजव्या पायाला कडकडून चावा घेतला. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखावत झाली. दरम्यान अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रमेश गवळी यांनी आरडाओरड केली. त्यामुळे रानडुकराचा कळप पळून गेला. परिसरातील शेतकर्‍यांनी तातडीने शेतात धाव घेऊन जखमी रमेश यांना उपचारासाठी गोरेगाव येथे दाखल केले त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सेनगाव तालुक्यामध्ये अनेक शिवारांमधून रानडुक्कर, रोही या प्राण्यांचे कळप आहेत. सध्या बहुतांश भागांमध्ये पेरणी झाली असून या प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिके उध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. तर रानडुकरांच्या हल्ल्यामुळे शेतकरी देखील शेतात जाण्यास घाबरू लागले आहे. वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्‍यांतून केली जात आहे.

Back to top button