मडगाव : एक कोटींचे सोने जप्त; टोळीचा पर्दाफाश | पुढारी

मडगाव : एक कोटींचे सोने जप्त; टोळीचा पर्दाफाश

मडगाव, पुढारी वृत्तसेवा : रेल्वेत चोरी करणार्‍या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांच्या संयुक्त मोहिमेतून कोकण रेल्वे पोलिसांनी सोमवारी चार संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचे एक कोटी रुपयांचे सोने व 50 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळमधून संदीप भोसले (वय 40), अक्षय चिनवाल (28) यांना अटक करण्यात आली. अर्चना ऊर्फ आर्ची मोरे (वय 42), धनपत बेड (44) यांना मुंबईतून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मे 2023 रोजी काणकोण रेल्वे स्थानकावर गाडी क्रॉसिंगसाठी थांबलेली असताना 4 कोटी रुपये किमतीचे 7 किलो सोन्याच्या सोनसाखळ्या असलेल्या बॅगेची चोरी करण्यात आली होती. संपत जैन यांच्याकडे काम करणार्‍या अशोक आर. यांनी याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. कोकण रेल्वे पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी पोलिस निरीक्षक सुनील गुडलर व सहकार्‍यांच्या साथीने तपासाला सुरुवात केली.

दोन पथकांच्या सहाय्याने कर्नाटक व महाराष्ट्रात या प्रकरणी तपास करण्यात आला. कवठेमहांकाळ येथून संदीप भोसले व अक्षय चिनवल (मूळ रा. खानापूर, बेळगाव) यांना 28 जून रोजी ताब्यात घेण्यात आले होते.

संशयितांना अटक करून काणकोण न्यायालयात हजर करण्यात आले असता 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. चौकशीदरम्यान, अर्चना मोरे (रा. तलोजा, नवी मुंबई) हिचे नाव पुढे आले. सोन्याचे दागिने नक्की कधी येणार याची माहिती अर्चना मोरे यांनी संशयित संदीप भोसले व अक्षय चिनवल यांना दिल्याचे तपासात स्पष्ट झाले.

कोकण रेल्वे पोलिसांनी मुंबईला जाऊन ओशिवारा पोलिसांच्या सहकार्याने 1 जुलै रोजी तिला ताब्यात घेतले व चौकशीअंती अटक केली. संशयित अर्चना हिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरीत सहकारी असलेल्या संशयित धनपत बेड (वय 44, रा. परेल ईस्ट, मुंबई) याला अटक करण्यात आली. त्यानंतर संशयितांकडून 1900 ग्रॅम वजनाचे सुमारे 1 कोटी रुपयांचे वितळवलेल्या स्वरुपातील गोल्ड बार व 50 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.

Back to top button