पुणे : मोबाईलवरून भरा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज | पुढारी

पुणे : मोबाईलवरून भरा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) घेण्यात येणार्‍या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (CET) आणि प्रवेश प्रक्रियांची माहिती तत्काळ मिळावी, यासाठी सीईटी सेलकडून महा सीईटी सेल मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. हे अ‍ॅप विद्यार्थी आणि पालकांना गुगल प्ले स्टोअरहून विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली आहे.

सीईटी सेलकडून विविध पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात येतात. या सीईटी परीक्षांच्या माहिती पुस्तिका डाऊनलोड करणे, अर्ज भरणे, शुल्क भरणे, त्यानंतर सीईटी परीक्षा होऊन निकाल जाहीर होणे, अशांबाबत विद्यार्थ्यांची उत्सुकता असते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना निकालानंतर प्रवेश प्रक्रियांची नोंदणी, कागदपत्रे अपलोड करणे, कॉलेजांचे पसंतीक्रम नोंदवणे अशी कार्यवाही करावी लागते. त्यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या वेबसाइटवर अवलंबून राहावे लागते.

अनेक वेळा वेबसाइट न चालणे, सर्व्हर हँगसारख्या तांत्रिक अडचणी उद्भवून विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळत नाही. या सर्वांवर उपाय म्हणून सीईटी सेलने ममहा सीईटी सेलफ या नावाने अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. सीईटी सेलकडून प्रसिद्ध करण्यात येणारी सर्व माहिती अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे.

अ‍ॅप प्राथमिक स्तरावर असल्याने, सध्या विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा आणि त्यांच्या प्रवेश परीक्षांशी निगडीत माहिती उपलब्ध आहे. या अ‍ॅपवर अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, कॉलेजांचे पसंतीक्रम भरणे, अशी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती वारभुवन यांनी दिली.

हेही वाचा

वेल्हे, हवेलीत भात रोपांना जीवदान; अपुर्‍या पावसाने चिंता व्यक्त

औरंगजेबाचे उदात्तीकरण चुकीचे : छत्रपती संभाजीराजे; खालच्या थराचे राजकारण थांबवा

ब्लॅक स्पॉट निर्गतीचा प्रस्ताव धूळ खात

Back to top button